हॉटेल, पेट्रोल पंप चालकांनी दुभाजक तोडून केले रस्ते; १५ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल
By राम शिनगारे | Published: November 4, 2022 08:05 PM2022-11-04T20:05:20+5:302022-11-04T20:05:43+5:30
महामार्गावर अपघात वाढल्याची घेतली दखल घेत पोलीस अधीक्षकांनी केली कारवाई :
औरंगाबाद : महामार्गावर असलेल्या हॉटेलसह इतर व्यावसायिकांनी दुभाजक तोडून ग्राहकांची वाहने येण्यासाठी रस्ता तयार केल्याचा प्रकार जिल्ह्यातील विविध महामार्गांवर समोर आला आहे. त्यातून अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी गंभीर दखल घेत महामार्ग व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून १५ व्यावसायिकांवर गुन्हे नोंदविले आहेत.
पोलीस अधीक्षक कलवानिया यांनी महामार्गावरील दुभाजक तोडल्याची प्रकार समोर आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत महामार्ग व्यवस्थापन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर आतापर्यंत कन्नड ग्रामीण, खुलताबाद, पाचोड, गंगापूर, करमाड पोलीस ठाण्यात १५ आस्थापनांच्या मालकांविरोधात गुन्हे नोंदविले. त्यात हॉटेल, पेट्रोलपंप, फॉर्म हाऊस, वॉशिंग सेंटरच्या मालकांचा समावेश आहे.
कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात हॉटेल माउली, हॉटेल शिवराज, हॉटेल अशोक, हॉटेल आबाचा वाडा, हॉटेल श्रीमूर्ती, गर्जे फार्म हाऊस, हादगाव वॉशिंग सेंटर याचा समावेश आहे. हे सर्व व्यवसाय कन्नड महामार्गावरील आहेत. खुलताबाद ठाण्यात कसाबखेडा ते पळसवाडी मार्गावरील हॉटेल आम्रपाली, हॉटेल रोहिणीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूर ठाण्यात हॉटेल बटर फ्लाय (जुने कायगाव), हॉटेल लोकसेवक, गांधी पेट्रोल पंप, हॉटेल जिजाऊ, गॅनोज कंपनी, एचपी पेट्रोलपंप, हॉटेल इंडियन ढाबा आणि ढोरेगाव ग्रामपंचायतीच्या विरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला. पाचोड ठाण्यात आडूळ बायपासजवळ माउली लॉन्ससमोर रजापूर, दाभरूळ गावाजवळ रस्ता तयार करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद केली. करमाड ठाण्यात जालना रस्त्यावरील करमाड गावाजवळ रस्त्यावर दुभाजक तयार करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुभाजकामुळे अपघातास निमंत्रण
महामार्गालगत असलेल्या व्यवसायिकांनी स्वत: च्या फायद्यासाठी दोन लेनमधील दुभाजक तोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करून वळण रस्ता बनवू नये. तोडलेले दुभाजक अपघातास निमंत्रण देतात. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्थांची गय केली जाणार नाही. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिला आहे.