हॉटेलमालकाच्या मारेकऱ्यास उत्तरप्रदेशातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:00 PM2019-01-22T22:00:54+5:302019-01-22T22:02:56+5:30
परप्रांतीय हॉटेल चालकाचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून जेरबंद केले आहे.
वाळूज महानगर : साडेतीन महिन्यांपूर्वी बजाजनगरात परप्रांतीय हॉटेल चालकाचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून जेरबंद केले आहे. सोनू शर्मा असे आरोपीचे नाव आहे.
बजाजनगरात कमलेश श्यामलाल पनिका (३८) हा हॉटेल चालवून कुटुंबाचा उदरनिवाह करीत होता. १४ आॅक्टोबरला सकाळी कमलेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मिळून आला. त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते. मारेकºयास उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथून पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव सोनू शर्मा (२५) असल्याचे सांगत कमलेशचा खून केल्याची कबुली दिली.
कमलेश हा सतत दारु पिऊन व गांजाचा नशा करुन विनाकारण मारहाण व शिवीगाळ करीत असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. या प्रकाराला कंटाळून तो कामगार चौकात रहावयास गेला होता. मात्र घटनेच्या दिवशी कमलेशने कामगार चौकातून त्यास बजाजनगरात आणून पुन्हा मारहाण व शिवीगाळ केली. यामुळे कमलेशच्या डोक्यावर फावड्याने मारहाण केल्याचे सोनूने जबाबात म्हटले आहे.