तब्बल १७५ दिवसांनी उघडणार हॉटेल्स आणि परमिटरुम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 08:23 PM2020-10-04T20:23:20+5:302020-10-04T20:24:34+5:30
खवय्यांची प्रतिक्षा संपली असून आता दि. ५ ऑक्टोबरपासून नियमात बसून आणि शासनाच्या मार्गदर्शक सुचना पाळून हॉटेलमध्ये बसून चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेणे शक्य होणार आहे.
औरंगाबाद : शहर व परिसरातील हॉटेल्स आणि परमिटरुम्स मागील १७५ दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद होत्या. मात्र खवय्यांची प्रतिक्षा संपली असून आता दि. ५ ऑक्टोबरपासून नियमात बसून आणि शासनाच्या मार्गदर्शक सुचना पाळून हॉटेलमध्ये बसून चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेणे शक्य होणार आहे.
सहा महिन्यांपासून हॉटेलचालकांचा व्यवसाय पुर्णत: ठप्प होता. पार्सलसुविधेमुळे हॉटेल चालकांना थोडा तरी आधार मिळाला. पण पुर्ण क्षमतेने हॉटेल्स चालू नसल्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. कोरोनामुळे हॉटेलवर अवलंबून असलेली सर्व सेवा इंडस्ट्री कोलमडली होती. आता या निर्णयामुळे मात्र हॉटेल चालकांना दिलासा मिळाला आहे.
प्रत्येक हॉटेल चालकांना कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक असणार आहे आणि शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणारच आहे, अस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद शहरात १३ वाईनशॉप आहेत. बिअरशॉपी ६० हून अधिक आहेत. १२५ दुकाने देशीमद्य विक्रीची आहेत. ४५० च्या आसपास परमिटरुम्स व रेस्टॉरंट आहेत. हा सर्वच व्यवसाय कोरोनामुळे मंदावलेला होता.