औरंगाबादमध्ये रात्री साडेअकरापर्यंत सुरू राहणार हॉटेल, रेस्टारंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 07:26 PM2020-10-17T19:26:03+5:302020-10-17T19:31:06+5:30
३ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पालिका हद्दीतील हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट या आस्थापना सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत खुल्या राहतील.
औरंगाबाद : शहरातील हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिली आहे. मिशन बिगिन अगेनअंतर्गत राज्य शासनाने ३ ऑक्टोबरपासून नवीन आदेश काढले आहेत. या आदेशानुसार हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचाच संदर्भ देत पाण्डेय यांनी औरंगाबाद शहरासाठी स्वतंत्र आदेश काढले आहेत. शहरात आठवडी बाजार, जनावरांचा बाजार आणि व्यावसायिक प्रदर्शन सुरू करता येईल.
या आदेशात म्हटले आहे की, ३ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पालिका हद्दीतील हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट या आस्थापना सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत खुल्या राहतील. अन्य व्यापारी आस्थापने सकाळी सात ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू राहतील. महापालिका क्षेत्रातील सर्व औद्योगिक व उत्पादक युनिटस्मध्ये अत्यावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंचे उत्पादन सुरू करण्यास परवानगी असेल. सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल व त्यासारखी स्थळे बंदच राहतील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी असणार नाही.
खेळांच्या फक्त सरावासाठी परवानगी
औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील मैदानी खेळ जसे की, क्रिकेट, खो-खो, इनडोअर गेम बॅडमिंटन, लॉनटेनिस या खेळांच्या फक्त सरावासाठी परवानगी देण्यात येत आहे. क्रीडा स्पर्धा घेणे, उपक्रम राबवणे, संमेलन घेणे याला बंदीच राहणार आहे. या खेळांचा सराव करण्यासाठीच्या जागी गर्दी टाळावी. सरावासाठी आवश्यक तेवढ्याच खेळाडूंना प्रवेश देण्यात यावा. दहा वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये. सरावास येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे.