औरंगाबादेत रात्री ११ वाजेच्या आत होणार हॉटेल्स बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 06:18 PM2018-05-31T18:18:24+5:302018-05-31T18:19:54+5:30
नियम डावलून जी हॉटेल्स उशिरापर्यंत सुरू राहतील त्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
औरंगाबाद : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खबऱ्याची सक्षम संकल्पना राबविणार आहोत. याचबरोबर शहरातील विनापरवाना हॉटेल्स आणि हॉटेलमध्ये विनापरवाना चालू असलेले मद्यपान या सर्वांवर गुन्हे शाखेचे विशेष पथक कारवाई करणार आहे, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बुधवारी स्पष्ट केले.
शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सामाजिक सलोखा ठेवण्यास प्राधान्यक्रम राहणार आहे, त्यासाठी हॉटेलमधून जेवणासोबत विनापरवाना देशी-विदेशी दारूचा चालू असलेला धंदा गुन्हेगारीला कारणीभूत आहे. नियम डावलून जी हॉटेल्स उशिरापर्यंत सुरू राहतील त्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या हॉटेलचालकावर, तसेच ग्राहकांवरही कारवाई केली जाणार आहे.
शहरात विनाकारण उशिरापर्यंत दारू पिऊन गोंधळ घालत फिरणाऱ्या वाहन चालकांनाही टार्गेट केले जाणार आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रकाराला व गुन्हेगारीलादेखील आळा बसेल. मंगळवारी पदभार घेतल्यावर त्याच रात्री शहरातील विविध ठाण्यांच्या हद्दीतील विनापरवाना हॉटेल्स व उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल्स रात्री ११ वाजेलाच बंद करण्यात आल्या होत्या. मंगळवारी सर्व हॉटेल्स व्यावसायिकांना पोलिसांनी नियम पाळण्याच्या सूचना केल्या आहेत.
वाहतूक व्यवस्थेवर लक्ष
महापौर नंदकुमार घोडेले यांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन शहरातील सिग्नल आणि बेशिस्त वाहतुकीकडे लक्ष देऊन सुरळीत करण्याची मागणी केली आहे.