तासाभराचा विलंब ठरू शकतो जीवघेणा
By Admin | Published: September 23, 2014 11:04 PM2014-09-23T23:04:26+5:302014-09-23T23:22:51+5:30
हिंगोली : गतिमान आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची निष्काळजी हृदयरोगाकडे घेऊन जात आहे.
हिंगोली : गतिमान आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची निष्काळजी हृदयरोगाकडे घेऊन जात आहे. परिणामी, मागील चार वर्षांत ग्रामीण भागात दुपटीने तर शहरी भागात सहा पटीने रूग्ण वाढले. विशेषत: लक्षणाविना अचानक आणि अनपेक्षितपणे आलेल्या झटक्यानंतरच हा आजार उद्भवल्याचे समजते. तद्नंतर तासाभरात जर रुग्णालय जवळ केले नाही तर प्राणास मुकावे लागते.
आरोग्याच्या समस्येविना माणूस सापडणे दुर्मिळच. दिवसेंदिवस नवनवे आजार समोर येताना दिसतात. गंभीर आणि दुर्धर आजारांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली. काही आजार सांगून येतात तर काही आजारांना स्वत:हून आमंत्रण देतो. दोन्हीपेक्षा वेगळा असलेल्या हृदयरोगाचे वैैशिष्ट हे अनपेक्षितपणा आहे; परंतु त्यासाठी मानवाची बदलती जीवनशैैली कारणीभूत ठरते. दिनक्रमातील गतिमानता काहीअंशी या आजाराकडे घेऊन जाते. त्याहीपेक्षा तानतणावाचा परिणाम आजारांना निमंत्रण देणारा ठरतो. तत्क्षणी आरोग्याचा निष्काळजीपणा अधिक भोवण्याची शक्याता असते. प्रामुख्याने हृदयास होणाऱ्या अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे तो उद्भवतो. हृदयातील रक्तवाहिन्यांत चरबीचा साठा होऊन त्याची पोकळी निर्माण होते. परिणामी, रक्तपुरवठा बंद पडल्याने झटका यतो. पुरूषांमध्ये ४५ तर स्त्रियांमध्ये ५५ वर्षांपेक्षा जास्त व्यक्तांनी अधिक धोका संभवतो. आजघडीला या आजारालाही वय राहिले नाही. घरातील व्यक्तींना व जवळच्या नातेवाईकांना जर हृदयरोग असेल तर घरातील कोणालाही हा आजार होऊ शकतो. अचानक छातीत वेदना होतात. तत्क्षणी रूग्णास चालवू नये आणि तातडीने दवाखाना जवळ करावा. हिंगोलीतील सामान्य रूग्णालयात या रूग्णांसाठी कसलीही व्यवस्था नाही. स्वतंत्र विभाग तर लांबचीच बाब आहे. परिणामी, खाजगी रूग्णालयात का होईना तासाच्या आत रूग्णांना घेऊन जाणे अगत्याचे ठरते. अन्यथा अधिक विलंब रूग्णांचे प्राण घेऊ शकतो.
हे आहेत उपाय
हा आजार होऊ नये म्हणून नियमित व्यायाम करावा, रक्ताची तपासणी करावी, चाळीसीनंतर वर्षातून एकदा ईसीजी काढून खात्री करावी. उपचार घेणाऱ्या रूग्णांनी दररोज तासभर चालावे, फास्टफूड, मांस, तेलकट पदार्थ खाऊ नये आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेण्याचा असल्ला डॉ. अगस्ती जवळेकर यांनी दिला. (वार्ताहर)