घरोघरी सुरू झाली शिरखुर्म्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 07:00 PM2019-05-30T19:00:59+5:302019-05-30T19:00:59+5:30
रमजान ईदचा खास मेनू म्हणजे ‘शिरखुर्मा’
औरंगाबाद : रमजान ईद सणाची गोडी वाढते ती शिरखुर्म्यामुळे. ईदला अजून आठवडा बाकी असला तरी घरोघरी शिरखुर्म्याची तयारी सुरू झाली असून, शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसत आहे. बहुतांश महिलांनी या वस्तू खरेदीही केल्या आहेत.
रमजान ईदचा खास मेनू म्हणजे ‘शिरखुर्मा’. ईदच्या दिवशी प्रत्येक मुस्लिम कुटुंबाच्या घरी बनणारा हा पदार्थ. याबाबत माहिती देताना एकतानगरमधील सादिया खान म्हणाल्या की, कुटुंब किती मोठे, ईदच्या दिवशी किती पाहुणे घरी येणार आहेत आणि किती जणांच्या घरी शिरखुर्मा पाठवायचा आहे, यावरून शिरखुर्म्यासाठी किती सामान आणायचे, हे ठरवले जाते. काही घरांमध्ये तर १० ते १५ लिटर दुधाचा शिरखुर्मा बनविला जातो. बदाम, काजू, खोबरे, किसमिस, पिस्ता, अक्र ोड, शेवया, खजूर, अंजीर, जर्दाळू, चारोळी असा सुकामेवा शिरखुर्म्यासाठी वापरण्यात येतो. अनेक घरांत आता या गोष्टींची खरेदी झाली असून, खोबरे किसून ठेवणे, बदाम सोडून इतर सुकामेव्याचे तुकडे करून ठेवणे, खजुरातून बिया काढून ठेवणे हे काम सुरू आहे. ईदच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर शिरखुर्मा बनवावा लागत असल्यामुळे या गोष्टींची तयारी आठवडाभर आधीपासूनच सुरू होते.
ईदच्या आदल्या दिवशी रात्री बदाम पाण्यात भिजवत टाकतात आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचे साल काढून बारीक तुकडे के ले जातात आणि हे तुकडे मग शिरखुर्म्यात टाकले जातात. काहीजण हे पदार्थ आधीच तळून ठेवतात. त्यामुळे ईदच्या आदल्या दिवशी किंवा ईदच्या दिवशी महिलांची गडबड होत नाही.
असा बनवा शिरखुर्मा
शिरखुर्मा नेमका तयार होतो कसा, याची उत्सुकता अनेक महिलांमध्ये दिसून येते. या सगळ्यांसाठी शिरखुर्मा बनविण्याची कृती सांगताना सादिया खान म्हणाल्या की, सगळ्यात आधी रात्री बदाम पाण्यात भिजत घालायचे. दुसऱ्या दिवशी थोड्या तुपात शेवया टाकून त्या लालसर होईपर्यंत भाजायच्या. यानंतर सर्व सुकामेवा तुपात परतायचा. यानंतर यात आटवलेले व साखर घातलेले दूध टाकायचे. अंजीर, जर्दाळू, खजूर या गोष्टी नंतर टाकाव्यात. त्यानंतर वरून बदामाचे काप टाकून शिरखुर्मा सजवायचा.
ईदला शिरखुर्माच का?
ईदला शिरखुर्माच का बनविला जातो, याविषयी सांगताना मुस्लिम समाजातील ज्येष्ठ व्यक्ती सांगतात की, मूळ शिरखुर्मा म्हणजे दूध आणि खजूर यांचेच मिश्रण होय. पूर्वी खजूर हे सौदी अरेबियाचे मुख्य पीक होते, त्यामुळे ते तेथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे सगळ्यांना सहज घेणे शक्य व्हायचे. त्यामुळे दूध म्हणजे शिर आणि खुर्मा म्हणजे खजूर या दोन्हींच्या मिश्रणातून शिरखुर्मा तयार झाला. काळानुसार आवड आणि बदलत जाणाऱ्या खाद्यसंस्कृतीमुळे यात अनेक बदल होत गेले आणि यामध्ये शेवया व इतर सुकामेवाही येत गेला.