घर एकाचे, विद्युत मीटर मात्र दुसऱ्याच्या नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 03:21 PM2018-06-16T15:21:54+5:302018-06-16T15:23:03+5:30
पडेगाव पॉवर हाऊससमोर किरायाने राहणाऱ्या व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वत:चे घर दाखवून विद्युत जोडणीसाठी अर्ज केला.
औरंगाबाद : पडेगाव पॉवर हाऊससमोर किरायाने राहणाऱ्या व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वत:चे घर दाखवून विद्युत जोडणीसाठी अर्ज केला. महावितरण कंपनीच्या छावणी उपकेंद्राच्या अधिकाऱ्यांनीही त्याची खातरजमा न करता तेथे वीज जोडणी दिली. विशेष म्हणजे, त्याच घराचा विद्युत पुरवठा काही दिवसांपूर्वीच कायमस्वरूपी खंडित करून मीटर जप्त केले होते.
या संदर्भात शेख मोबीन शेख नूर मोहम्मद यांनी कळविले की, पडेगाव पॉवर हाऊस परिसरात आपले स्वत:चे घर आहे. आपल्या घरात अब्दुल राजीक हा किरायाने राहत होता. राजीकने बनावट बाँडपेपरच्या आधारे आपले घर स्वत:च्या नावावर करून घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर २५ मे २०१८ रोजी छावणी उपकेंद्राच्या कार्यालयात आपल्या घराचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करून मीटर जप्त करावे, असा अर्ज दिला होता. त्यानुसार वीजपुरवठा खंडित करण्यात आला व मीटर जप्त करण्यात आले.
अब्दुल राजीक या किरायादाराने खोट्या कागदपत्रांच्या आधारे घर बळकावल्याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याबाबतची कल्पनाही आपण छावणी उपकेंद्राच्या अभियंत्यांना दिली होती. त्याकडे डोळेझाक करीत आपल्याच घरामध्ये अब्दुल राजीकच्या नावे पुन्हा विद्युत मीटर देण्यात आले आहे.
अब्दुल राजीक हा इलेक्ट्रीशियनची कामे करीत असून, त्याचे छावणी उपविभागातील कनिष्ठ अभियंता जाधव यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत.
या प्रकरणाची अब्दुल राजीक व कनिष्ठ अभियंता जाधव यांची चौकशी करण्याची मागणी, शेख मोबीनने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.