स्वप्नातील घरांच्या किमती वाढल्या; समर्थनगर, चिकलठाणा रोड परिसर सर्वांत महाग घर
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 30, 2024 07:44 PM2024-05-30T19:44:34+5:302024-05-30T19:45:56+5:30
देशभरात घराच्या किमतीत साधारण ८ ते १० टक्के वाढ झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : स्वत:चे हक्काचे घर पाहिजे, जिथे संसार सुखात करता यावा, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, योग्य वेळेवर खरेदीचा निर्णय घेतला नाही तर घराच्या किमती आवाक्याबाहेर निघून जातात आणि नंतर स्वप्न स्वप्नच राहते. रेडीरेकनर दर स्थिर राहिले असले तरी बांधकाम खर्च वाढल्याने मागील दोन महिन्यांत घरांच्या किमती वाढल्या आहेत. शहराचा विचार केला तर सध्या समर्थनगर, जालना रोड, चिकलठाणा रोड, सिडको एन वन परिसर, शहानूरमियाँ दर्गा रोड, उल्कानगरी इ. भागांत सर्वांत जास्त भावात घरे विकली जात आहेत.
घरांच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्या
देशभरात घराच्या किमतीत साधारण ८ ते १० टक्के वाढ झाली आहे. शहरात चालू आर्थिक वर्षात मागील दोन महिन्यांत प्रतिचौरस फुटामागे १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे.
शहरातील विविध भागांतील घराच्या सर्वसाधारण किमती
(२ बीएचके, १ हजार चौरस फूट )
परिसर फ्लॅटचे दर
१) समर्थनगर - ७० ते ८० लाख
२) चिकलठाणा रोड- ६० ते ७० लाख
३) सिडको एन - ७० ते ८० लाख
४) शहानूरमियाँ दर्गा रोड - ६५ ते ७५ लाख
५) पैठण रोड- ४५ ते ५५ लाख
६) नाशिक रोड- २५ ते ३५ लाख
७) वाळूज- ३० ते ४० लाख
८) हर्सूल- ४० ते ५० लाख
म्हणून वाढल्या घरांच्या किमती
रेडीरेकनरचे दर सरकारने स्थिर ठेवल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. पण, बांधकाम खर्च तसेच कामगारांचे वेतनामध्ये वाढ होत आहे. याशिवाय महारेरामुळे नवनवीन नियम येत आहेत. त्यामुळे देखभाल खर्चही वाढला आहे. शहरात स्थलांतरितांची संख्याही वाढत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे ८ ते १० टक्क्यांनी घरांच्या किमती वाढल्या आहेत.
- आर्कि. नितीन बगडिया, माजी अध्यक्ष, क्रेडाई