एन-४ मधील घरे रस्त्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:04 AM2021-05-26T04:04:06+5:302021-05-26T04:04:06+5:30
औरंगाबाद : हनुमान चौक ते एन-४ मार्गे उच्च न्यायालयाकडे जाणारा रस्ता दोन ते अडीच फूट उंच झाल्यामुळे नागरिकांची घरे ...
औरंगाबाद : हनुमान चौक ते एन-४ मार्गे उच्च न्यायालयाकडे जाणारा रस्ता दोन ते अडीच फूट उंच झाल्यामुळे नागरिकांची घरे खाली गेली आहेत. गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसामुळे अनेक घरांच्या प्रवेशद्वाराजवळच पाणी साचले. सध्या साईडड्रेन आणि पेव्हिंग ब्लॉक टाकण्याचे काम सुरू असले तरी, पावसाचे पाणी बाहेर कसे जाणार असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
कार्यालयासमोर रस्त्याचे काम ठप्प
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याचे काम काही दिवसांपासून ठप्प पडले आहे. त्यामुळे एकतर्फी वाहतूक सुरू असून किरकोळ अपघात होत आहेत. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
‘ग्रामविकास’च्या दोन पुस्तकांचे प्रकाशन
औरंगाबाद : ग्रामविकास संस्थेच्या जलविषयक दोन पुस्तकांचे प्रकाशन आदर्श गाव संकल्प व प्रकल्पचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्याहस्ते केले. ‘सर्वांसाठी पाणी; वेध पाणी प्रश्नांचा’ या नरहरी शिवपुरे लिखित आणि ‘चित्तेनदी पुनरुज्जीवन अभियान एक शोधयात्रा’ या संतोष लेंभे लिखित पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, ‘वाल्मी’चे माजी संचालक सु. भि. वराडे, डॉ. सर्जेराव ठोंबरे यांची उपस्थिती होती.
दुभाजकांमधील वृक्ष वाळले
औरंगाबाद : शहरातील दुभाजकांमध्ये लावण्यात आलेले वृक्ष पाण्याअभावी वाळले आहेत. मागील दोन महिन्यांत पालिकेच्या यंत्रणेने दुभाजकातील झाडांना पाणी न दिल्यामुळे ती वाळली आहेत. विकास आराखड्यातील प्रत्येक रस्त्यावरील दुभाजकात वृक्षारोपण करण्यात आले आहे.
...तर मनसे न्याय मिळवून देईल
औरंगाबाद : प्रशासनातील सर्व यंत्रणांनी कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या आहेत. आता रुग्णसंख्या कमी होत असताना प्रशासनाने व्यापाऱ्यांची दुकाने सील करू नयेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नयेत. व्यापारी, दुकानदारांच्या अडचणी प्रशासनाने समजून घ्याव्यात, अन्यथा मनसे न्याय मिळवून देईल, असे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, सतनाम गुलाटी यांनी कळविले आहे.
मधला मार्ग खुला करण्याची मागणी
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातून अप्पर तहसील आणि ग्रामीण तहसीलकडे जाणारा मधला मार्ग प्रशासनाने बंद केला आहे. सदरील मार्ग खुला करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मार्ग बंद असल्याने लांबून नागरिकांना कार्यालयाकडे जावे लागत आहे.
लॉकडाऊनमुळे कुलर्स दुरुस्ती केली नाही
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या अभ्यागतांची गर्दी लॉकडाऊनमुळे नगण्य आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी लावण्यात आलेले वॉटरकुलर प्रशासनाने दुरुस्त केले नाहीत. लॉकडाऊननंतर ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न होतील, असे सूत्रांनी सांगितले.
भूसंपादनास विलंब
औरंगाबाद : विमानतळ धावपट्टी रुंदीकरणासाठी सक्षम अधिकारी नेमण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. भूसंपादनासाठी तालुका भूमिअभिलेखने मोजणी केली. मात्र सक्षम अधिकारी नियुक्ती रखडल्यामुळे भूसंपादन प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होतो आहे.
१४६० रेमडेसिविर इंजेक्शन्सचा पुरवठा
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालय, मेल्ट्रॉन रुग्णालय आणि घाटी रुग्णालयामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. २४ मेपर्यंत खासगी रुग्णालयांना १४६० रेमडेसिविर इंजेक्शन्सचा पुरवठा करण्यात आला. खासगी रुग्णालयांना मागणीप्रमाणे इंजेक्शन्स देण्यात येत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.