सातारा देवळाईतील घरे टुमदार, पण पाहुण्यांना प्यायला द्यायला पाणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:05 AM2021-02-24T04:05:37+5:302021-02-24T04:05:37+5:30
मनपाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नसतानाही शहराचा दक्षिण भाग झपाट्याने टोलेजंग इमारतीच्या रूपाने उभा राहतो आहे. ग्रामपंचायतीच्या काळात जानेवारीपासूनच या भागात ...
मनपाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नसतानाही शहराचा दक्षिण भाग झपाट्याने टोलेजंग इमारतीच्या रूपाने उभा राहतो आहे. ग्रामपंचायतीच्या काळात जानेवारीपासूनच या भागात पाण्यासाठी सातारा-देवळाई दोन्ही ग्रामपंचायतीला जिल्हा प्रशासनाची मदत घ्यावी लागत होती. सातारा- देवळाईतील नागरिकांना दरवर्षी फक्त पाण्यावरच जास्तीचा खर्च करावा लागत होता. आता मनपात दाखल होऊन एक पंचवार्षिक उलटले. पण नागरिकांच्या स्थितीत काहीही फरक पडलेला नाही.
शासनाच्या तिजोरीतून शहरासाठी होऊ घातलेल्या पाणीपुरवठा योजनेत या परिसराचा समावेश करण्यात आला आहे; परंतु त्याकामाला सुरूवात केव्हा होणार याची सातारा-देवळाईकरांना काडीमात्र खबर नाही. सातारा वॉर्ड कार्यालयात जावून नागरिकांना पाण्यासाठी बाराही महिने आगाऊ पैसे भरावे लागतात किंवा खासगी टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागते.
विरळ वसाहती झाल्या दाट...
सातारा-देवळाईत विरळ वसाहती होत्या. आता घनदाट होऊन पाऊण लाखाच्यावर लोकसंख्या पोहोचली आहे. बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेल्या टोलेजंग सदनिकांमुळे परिसर शोभून दिसतो आहे. परंतु जलवाहिनीची सोय कुणीच केलेली नाही. नुकतेच रस्ते बऱ्यापैकी झालेले असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
- रोहन पवार (सातारा परिसर)
बजेट बिघडलेले आहे...
लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे घराचे हप्ते थकले. अनेकांचे भाडेकरू गावाकडे गेल्याने मोठी पंचायत झाली. त्यातही विकतचे पाणी घेऊन तहान भागविताना जीव मेटाकुटीला आला. कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची योजना त्वरित राबवावी.
- बद्रिनाथ थोरात (शिक्षक)