‘लग्ननाट्या’च्या बेडीनंतर नववधूला हातकडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2016 12:07 AM2016-05-21T00:07:22+5:302016-05-21T00:13:39+5:30
औरंगाबाद : लग्नाच्या आठव्या दिवशीच रोख ३५ हजार रुपये आणि ४ लाख १० हजारांच्या दागिन्यांसह पळून गेलेल्या नववधूला साथीदारासह वाळूज औद्योगिक वसाहतीत गुरुवारी क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली.
औरंगाबाद : लग्नाच्या आठव्या दिवशीच रोख ३५ हजार रुपये आणि ४ लाख १० हजारांच्या दागिन्यांसह पळून गेलेल्या नववधूला साथीदारासह वाळूज औद्योगिक वसाहतीत गुरुवारी क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली.
शोभा ऊर्फ सुनीता राजू कुलथे (४०, रा. रांजणगाव शेणपुंजी, मूळ रा. पूर्णा, जि. परभणी) आणि तिचा साथीदार युनूस वजीर शेख (रा. कमळापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, म्हाडा कॉलनी येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त लष्करी अधिकारी शिवानंदन सत्यन यांनी ३ मे रोजी ४० वर्षांवरील एक जीवनसाथी पाहिजे, अशी जाहिरात वर्तमानपत्रात दिली होती. या जाहिरातीच्या आधारे सुमारे ३५ महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. यापैकी शोभा ऊर्फ सुनीता ही आपणास पसंत असल्याचे शिवानंदन यांनी तिचा मानलेला भाऊ शेख सलमान ऊर्फ शेख युनूस यास कळविले होते. त्यानंतर ८ मे रोजी त्यांनी वरद गणेश मंदिर येथे हिंदू पद्धतीने विवाह केला. या विवाहप्रसंगी शिवानंदन यांनी पत्नी सुनीता हिच्या गळ्यात तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र घातले होते. पाच दिवसांनी सुनीता हिने संधी साधून साथीदाराच्या मदतीने शिवानंदन यांच्या घरातील ४ लाख १० हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख ३५ हजार रुपये घेऊन पोबारा केला. शिवानंदन यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांचे मोबाईलही बंद होते. शिवानंदन यांनी क्रांतीचौक ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मोबाईलवरून ठावठिकाणा शोधून गुरुवारी रात्री एमआयडीसी वाळूज परिसरात सापळा रचून जेरबंद केल्याचे पोहेकॉ गोपाल सोनवणे यांनी सांगितले.
श्रीमंत होण्याचा शॉर्टकट जेलमध्ये...
आरोपी सुनीता हिचा पती दारू प्राशन करून सतत त्रास देत होता, त्यामुळे तिने त्यास सोडले. तिला एक मुलगा आणि मुलगी आहे.
रांजणगाव येथे घर भाड्याने घेऊन राहत असताना धुणी, भांडी करून घर चालविताना तिच्या नाकीनऊ येत आहे. अशातच तिची ओळख शेख युनूससोबत झाली.
वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून सुखी जीवन जगण्यासाठी संधी चालून आल्याचे वाटले आणि शेख युनूसच्या मदतीने ती शिवानंदन यांच्याशी संपर्क साधून लग्न केले.
मात्र, पैसे कमविण्याचा कोणताही शॉर्टकट मार्ग कारागृहात नेणारा असल्याचे समजल्याने आता तिला पश्चात्ताप होत आहे.
आज तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावल्याचे पोहेकॉ. सोनवणे यांनी सांगितले.