गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीच सहा गुंठे जमीन परस्पर विकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 06:16 PM2018-10-25T18:16:41+5:302018-10-25T18:17:56+5:30
सभासदाला दिलेली सहा गुंठे जागा त्यांच्या समंतीविना गृहनिर्माण सहकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीच परस्पर विक्री केल्याचे समोर आले.
औरंगाबाद : सभासदाला दिलेली सहा गुंठे जागा त्यांच्या समंतीविना गृहनिर्माण सहकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीच परस्पर विक्री केल्याचे समोर आले. याप्रकरणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
आनंद गोविंद मुळे (रा. पिंपरी चिंचवड, पुणे), राजेंद्र विष्णुपंत सदावर्ते (रा. धावणी मोहल्ला, शाहगंज), संजय विष्णुपंत सदावर्ते, चेतन प्रकाश चांडोले (रा.नाशिक), लक्ष्मण त्रिंबक चिंडोलेरा आणि शाम पंढरीनाथ बेदडे (रा.औरंगाबाद), अशी आरोपींची नावे आहेत. सातारा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पुरुषोत्तम प्रभाकर पवार (रा. गणेशनगर, धायरी, पुणे) यांच्या वडिलांनी नक्षत्रवाडी येथील संत शिरोमणी नामदेव महाराज गृहनिर्माण सोसायटीचे सभासदत्व घेतले होते.
१९८१ साली नियोजित गृहनिर्माण संस्थेतील सहा गुंठे जागा त्यांना देण्यात आली. त्याबाबतची कागदपत्रेही सोसायटीने तक्रारदार यांच्या वडिलांना दिली होती. तक्रारदारांच्या वडिलांच्या परस्पर आरोपींनी त्यांची सहा गुंठे जागा २००७ साली विक्री केली. या जागेला आज लाखो रुपये किंमत आहे. तक्रारदार हे त्यांच्या वडिलांचा भूखंड पाहण्यासाठी गृहनिर्माण सोसायटीत गेले तेव्हा त्यांना आरोपींनी कशाची जागा, कोणता भूखंड असा सवाल करीत तुमच्या वडिलांची येथे जागा नसल्याचे सांगितले.
तक्रारदारांनी त्यांना संस्थेची कागदपत्रे दाखविली; मात्र आरोपींनी त्यांचे ऐकून घेतले नाही. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्या वडिलांना देण्यात आलेली सहा गुंठे जागा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर दुसऱ्याच व्यक्तीला विक्री केल्याचे समजले. त्यांनी याविषयी आरोपींकडे विचारणा केली असता त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली. आपली आणि आपल्या वडिलांची आरोपींनी फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी याविषयी सातारा ठाण्यात फिर्याद नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, तपास उपनिरीक्षक सागर कोते करीत आहेत.