प्रात्यक्षिक कसे करणार ? विद्यार्थी, पालकांत संभ्रमावस्था; बोर्ड मात्र परीक्षेच्या तयारीत व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 02:07 PM2021-03-12T14:07:44+5:302021-03-12T14:10:00+5:30
जिल्ह्यात ११५८ शाळांत दहावी आणि बारावीचे १ लाख २० हजार १८८ विद्यार्थी आहेत.
- योगेश पायघन
औरंगाबाद : जेमतेम दोन महिने सुरू झालेले प्रत्यक्ष वर्ग बंद होऊन जिल्ह्यात अंशतः लाॅकडाऊन लागल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली. शाळा, महाविद्यालयांकडून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना काही प्रमाणात सराव, प्रात्यक्षिकांकडे दुर्लक्ष झाले. मात्र, आता न झालेल्या प्रात्यक्षिकांवर परीक्षा कशी द्यायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना, तर न झालेल्या प्रात्यक्षिकांची परीक्षा कशी घ्यायची, असा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे.
जिल्ह्यात ११५८ शाळांत दहावी आणि बारावीचे १ लाख २० हजार १८८ विद्यार्थी आहेत. कोविडमुळे नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद होत्या. ऑनलाईन शिक्षणावरच भर होता. त्यातही विद्यार्थी उपस्थिती ४० टक्केपेक्षा अधिक नव्हती. त्यामुळे ऑनलाईनमध्ये विद्यार्थ्यांना किती पाठ्यांशाचे आकलन झाले, हा प्रश्नच असताना, प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यावर उपस्थिती ६० ते ७० टक्के झाली. वर्ग सुरू झाल्यावर मोजक्याच चार विषयांना प्राधान्य दिले गेले. त्यामुळे इतर विषयांचे काय, असा प्रश्न असताना, बहुतांश ठिकाणी प्रात्यक्षिकही झाले नाही. आता एकीकडे लेखी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षांचे टेन्शन असताना, पुन्हा ऑनलाईन वर्गातून एप्रिल महिन्यापूर्वी अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल, याची शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये चिंता आहे.
शिकलोच नाही, तर प्रात्यक्षिक कसे करणार?
गावात ऑनलाईन वर्ग कसेबसे झाले. शाळा सुरू झाल्यावर दोन तीन प्रात्यक्षिके झाली. परीक्षेत १० ते १२ प्रात्यक्षिके असतील तर ती कशी करावीत. शिकलोच नाही, तर प्रात्यक्षिक कसे करणार?
- सुकन्या गायकवाड, दहावीची विद्यार्थिनी
परीक्षेपेक्षा अधिक टेन्शन
परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या त्याचे टेन्शन आहेच. आता प्रात्यक्षिक परीक्षा. अनेक प्रात्यक्षिक अद्याप बाकी होत्या. वर्ग बंद झाल्याने ते प्रात्यक्षिक कसे शिकणार, त्याची परीक्षा द्यायची याचे परीक्षेपेक्षा अधिक टेन्शन आले आहे.
- प्रथमेश सूर्यवंशी, बारावीचा विद्यार्थी
मुले अस्वस्थ आहेत
अभूतपूर्व परिस्थिती आहे. बोर्ड परीक्षा घेण्यासाठी ठाम आहे. पुरेसे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यावरही चार तास शिकवण्याच्या निकषांत घेता आले नाही. सराव परीक्षांची तयारी सुरू होती. त्यात वर्ग बंद झाले. प्राधान्यक्रमाचे विषय शिकविताना प्रात्यक्षिकाकडे दुर्लक्ष झाले. शिकवले नाही, त्यावर प्रात्यक्षिक घ्यावे लागणार आहे. आधीच तणावात असलेली मुले आता त्यामुळे अस्वस्थ आहेत.
- अनिल देशमुख, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला, गणोरी
न कंटाळता अभ्यास करत राहावे
दहावी, बारावीच्या मुलांनी न कंटाळता अभ्यास करत राहावे. दरवर्षीप्रमाणे केंद्राची निवड करून परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. परीक्षा घेण्याबाबत काहीच संभ्रम नाही. कोरोनासदृश परिस्थिती असली तरी प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक परीक्षा बॅचनुसार घ्यायला अडसर नाही, असे मानले जात आहे. काही अडचण असेल तर विद्यार्थी, पालकांनी अपील करायचे आहे. अद्याप बोर्डाकडे कोणी यासंदर्भात अपील केले नाही.
- सुगता पुन्ने, सचिव, विभागीय परीक्षा मंडळ, औरंगाबाद
बोर्ड परीक्षेस बसलेले विद्यार्थी
जिल्हा - दहावीचे विद्यार्थी - बारावीचे विद्यार्थी
औरंगाबाद - ६५,०११ - ५५,१७७
बीड - ४२,५८८-३६,२६७
जालना - ३१,२९६-२८,२७७
परभणी - २८,४४०-२०,५५२
हिंगोली - १६२७६-११,५८०