हर्सूल जेलमधील कैदी उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये आलेच कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 06:55 PM2020-06-09T18:55:22+5:302020-06-09T19:09:38+5:30
कारागृह प्रशासनाने सर्व पॉझिटिव्ह कैद्यांना दोन दिवसांपूर्वी कोविड सेंटर येथे आणून सोडले.
औरंगाबाद : हर्सूल कारागृहातील तब्बल २९ कैदी किलेअर्क येथील कोविड सेंटरला आणण्यास महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच विरोध दर्शविला होता. कारागृहात ठेवूनच पॉझिटिव्ह कैद्यांवर औषधोपचार करण्याचा पर्याय महापालिकेने कारागृह प्रशासनासमोर ठेवला होता. यानंतरही मोठी जोखीम घेऊन कैदी कोविड सेंटरला कोणी आणले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अक्रम खान आणि सय्यद सैफ हे दोन कैदी पळाल्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. हर्सूल कारागृहातील तब्बल ११० कैद्यांची तपासणी तीन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यातील २९ कैदी पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले होते. सर्व कैद्यांना किलेअर्क येथील मनपाच्या कोविड सेंटरमध्ये आणून ठेवणे म्हणजे मोठी जोखीम होती. मनपाने कारागृहाच्या प्रशासनासमोर जागेवरच औषधोपचार करण्यासाठी सर्व यंत्रणा उभी करण्याचे आश्वासन दिले होते, अशी मनपाकडून मिळाली. कारागृह प्रशासनाने सर्व पॉझिटिव्ह कैद्यांना दोन दिवसांपूर्वी कोविड सेंटर येथे आणून सोडले. या सेंटरमधील दुसऱ्या मजल्यावर वेगवेगळ्या कक्षांमध्ये कैद्यांना ठेवून त्यांच्या रूमला कुलूप लावण्यात आले होते. कैदी पळून जाऊ नयेत म्हणून कारागृह प्रशासनाने वेगवेगळ्या शिफ्टमध्ये प्रत्येकी सहा कर्मचारी नेमले होते. रविवारी रात्री नाईट शिफ्टमध्ये असलेले सर्व सहा कर्मचारी कोविड सेंटरच्या दर्शनी भागात उपस्थित होते. तरीही दोन कैदी पसार झाले.
आमची टीम गेली होती
हर्सूल कारागृहात २९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर आमच्या डॉक्टरांची एक टीम कारागृहात गेली होती. त्यांनी कारागृह प्रशासनासोबत चर्चा केली. प्रशासनानेच सर्व पॉझिटिव्ह रुग्ण कोविड सेंटरला पाठवण्याचा निर्णय घेतला.
- नीता पाडळकर, आरोग्य अधिकारी, मनपा
coronavirus : धक्कादायक ! घाटीतून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला
जेलला कोविड सेंटर घोषित करणे योग्य ठरणार नाही
कारागृहातील कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी किलेअर्क येथील कोविड सेंटरला तात्पुरते जेल म्हणून घोषित केले आणि त्यानंतर कैद्यांना तेथे हलविण्यात आले. महापालिका आज पत्र पाठवून आणि व्हॉटस्अॅपवर मेसेज करून कैद्यांना जेलमध्ये परत घेऊन जा, आम्ही तेथेच कोविड सेंटर जाहीर करून उपचार करतो, असे सांगत आहे. मात्र, कारागृहातील कैद्यांची संख्या विचारात घेऊन जेलला कोविड सेंटर घोषित करणे योग्य ठरणार नाही.
- हिरालाल जाधव, हर्सूल कारागृह अधीक्षक