छत्रपती संभाजीनगरात बिबट आला कसा आणि गेला कुठे? शोध सुरू, दोन ठिकाणी लावले पिंजरे
By साहेबराव हिवराळे | Published: July 17, 2024 12:23 PM2024-07-17T12:23:49+5:302024-07-17T12:30:26+5:30
अंदाज व आखणी सुरू, जुन्नर येथून विशेष पथक छत्रपती संभाजीनगरात दाखल
छत्रपती संभाजीनगर : उल्कानगरी परिसरात सोमवारी पहाटे फिरताना बिबट सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यानुसार वन विभागाने पथक तैनात केले. परिसराला वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वेढा घातला आहे. झाडेझुडपांच्या ठिकाणी आणि शंभूनगरात पोद्दार शाळेच्या मागे पिंजरा ठेवून त्याच्यासाठी आमिष म्हणून दोन बकरे ठेवण्यात आले आहेत.
वन विभागातील सर्व तालुक्यांतील वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल, कर्मचाऱ्यांनी लोखंडी पिंजरे लावून बिबट्यासाठी जणू जाळे पसरविले आहे. परिसरात या पथकाला बिबट्याच्या पायाचे ठसे सापडले नसले, तरी सीसीटीव्हीवरील त्याच्या हालचाली अशा दिसत आहेत की, तो कित्येक दिवसांपासून नाल्याच्या कडेला झाडाझुडपांत वास्तव्यास असावा.
सातारा-देवळाई डोंगरातून आला ?
सातारा-देवळाई डोंगरातून बिबट्या आला असावा, असाही अंदाज अधिकाऱ्यातून व्यक्त होतोय. मोकाट कुत्रे येथे मोठ्या प्रमाणात असून, सध्या कुत्र्यांची संख्यादेखील कमी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले, कारण ते बिबटचे आवडते खाद्य असते. उल्कानगरी ते शंभूनगरापर्यंत तो दिसल्याच्या व्हिडीओ क्लिपिंग व्हायरल होत आहेत. १२ तारखेपासून त्याचे येणे-जाणे सीसीटीव्हीत कैद झाले. मंगळवारी मात्र तो दिवसभर दिसला नाही. जुन्नर येथून आलेल्या रेस्क्यू टीमचे डॉ. अविनाश मिसलकर व त्यांचे ११ सहकारी तयारीसह दाखल झाले. बिबट शहराबाहेर कसा जाऊ शकतो, अशा चर्चेस दिवसभर उधाण आले होते. परिसरातील मोकाट कुत्रे आणि काही डुको त्याला विनासायास शिकारीस मिळत असल्याने अद्याप कुणालाही त्याचा त्रास झाला नाही, परंतु लहान मुले घराबाहेर जाताना पालकांत चिंता वाटत आहे.
बिबट्या नर की मादी?
शहरातील गजबजलेल्या परिसरात हा बिबट्या आलाच कसा, असा प्रश्न आहे. ज्यांच्या घरात सीसीटीव्ही आहे ते रेकाॅर्डिंग शोधत आहेत. त्यानुसार वनअधिकारीही कामाला लागले आहेत. हे जनावर नर आहे की मादी, त्यावरून रेस्क्यू टीम त्याला पकडण्याची योजना आखत आहे.
-डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य
गस्त सुरू
कचरा संकलनाच्या गाड्या व लगत नाला आणि घनदाट झाडी आहे. तेथे दक्षता घेत पिंजरे लावले आहेत. पथकाची गस्त सुरू आहे.
-दादा तौर, वनपरिक्षेत्र अधिकारी