कॉपी कशी करता ? परीक्षेच्या दिवशी केंद्राजवळ झेरॉक्सही राहणार बंद !
By विजय सरवदे | Published: February 20, 2023 05:10 PM2023-02-20T17:10:07+5:302023-02-20T17:15:02+5:30
यंत्रणा अलर्ट मोडवर : बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची २ मार्चपासून
- विजय सरवदे
औरंगाबाद : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२वी) २१ फेब्रुवारीपासून, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १०वी) २ मार्चपासून सुरू होत आहे. या कालावधीत परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी संबंधित सर्वच यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.
विभागीय बोर्ड, माध्यमिक शिक्षण विभाग, महसूल विभाग, जि.प., पोलिस आदी सर्व यंत्रणा कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, यंदापासून ‘सुरक्षा खोली’ (कस्टडी रूम) ते परीक्षा केंद्रावर आणि विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका जाण्यापर्यंत संपूर्ण घटनाक्रमाचे चित्रीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी १२७ केंद्रांवर ६० हजार ४२५ विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे, तर दहावीच्या परीक्षेसाठी २२७ केंद्रांवर ६४ हजार ९१९ विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे.
- बारावीच्या परीक्षा २१पासून, दहावीची २ मार्चपासून
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा २१फेब्रुवारी ते २१ मार्च, तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.
- कोणत्या तालुक्यात किती केंद्र?
तालुका दहावी बारावी
औरंगाबाद (ग्रामीण)- १६- २० औरंगाबाद (शहर)- ७४- ३३ फुलंब्री- १२- १० सिल्लोड- २६- १६ सोयगाव- ०६- ०९ कन्नड- १९- १९ खुलताबाद- १०- १२ गंगापूर- २७- १२ वैजापूर- १७- ११ पैठण- २०- १५
- कॉपीबहाद्दरांची गय नाही
● दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी यंदा अतिशय कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत.
● परीक्षा केंद्रात प्रवेशावेळी शंभर टक्के विद्यार्थ्यांची झडती घेण्यात येणार आहे.
● परीक्षा केंद्रावर बैठे पथके परीक्षा सुरू होण्याआधी एक तास ते परीक्षेनंतर एक तास (उत्तर पत्रिका ताब्यात घेईपर्यंत) उपस्थित राहतील.
● केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल.