पराभवाचे दु:ख कसे विसरू; चुकले असेल तर क्षमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 11:40 PM2019-06-08T23:40:32+5:302019-06-08T23:41:01+5:30
भाजपने निवडणुकीत किती साथ दिली हे माहिती आहे. पराभवाचे हे दु:ख मी सहन करू शकत नाही. मी एवढी समाजसेवा केली. तरीही काही पदाधिकारी, शिवसैनिकांनी काम केले नाही. माझे काही चुकले असेल तर मला क्षमा करा, असे भावनिक आवाहन शिवसेना नेते माजी खा.चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी केले.
औरंगाबाद : भाजपने निवडणुकीत किती साथ दिली हे माहिती आहे. पराभवाचे हे दु:ख मी सहन करू शकत नाही. मी एवढी समाजसेवा केली. तरीही काही पदाधिकारी, शिवसैनिकांनी काम केले नाही. माझे काही चुकले असेल तर मला क्षमा करा, असे भावनिक आवाहन शिवसेना नेते माजी खा.चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी केले.
शिवसेनेच्या मराठवाडा शाखा स्थापनेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त ते सिडको नाट्यगृहात बोलत होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. संजय शिरसाट, विनोद घोसाळकर, आ. मनीषा कायंदे, महापौर नंदकुमार घोडेले आदींची यावेळी उपस्थिती होती. खैरे यांनी २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या व्यासपीठावरून अंत:करणातील दु:ख जाहीरपणे व्यक्त केले.
खैरे म्हणाले, मी चार वेळा खासदार झालो, कुणाचे नुकसान केले. कुणाला तिकीट मिळाले नाही म्हणून माझ्याबाबत नाराजी ठेवायला नको होती. मी निवडणूक जिंकणार. भाजपसोबत असो किंवा नसो हे पक्षप्रमुखांना ठामपणे सांगितले होते. ही शेवटची निवडणूक होती माझी; परंतु काही नतद्रष्ट लोकांना मी संपून जावे, असे वाटत होते. माझ्याकडे काहीही संपत्ती नाही. तरीही माझ्याविरोधात अफवा पसरवितात. माझी काय चूक झाली. (हर्षवर्धन जाधव यांचे नाव न घेता) खैरे म्हणाले, तरीही ट्रॅक्टरवर बसून गेले कशासाठी, जो बापाला, आईला मारतो, बायकोला मारतो. ती पोलिसात तक्रार करायला गेली होती. मला सांगायचे असते, तुम्ही उभे राहू नका. आता दोन समाजात संघर्ष उभा राहिला आहे. मला जे मतदान मिळाले, ते हिंदुत्ववादी आहे. एवढे होऊनही ट्रॅक्टर आणि भाजपवाल्यांना माफ करू या, असे पक्षप्रमुखांना बोललो. असेच भांडत राहिलो तर वंचिताचा विजय होईल. आता संघटनेत फेरबदल करावाच लागेल, याबाबत पक्षप्रमुखांना बोललो आहे.
माझा कोणताही गट नाही. मध्य आणि पूर्वमध्ये काय स्थिती आहे ते पाहा. फक्त तिकीट पाहिजे आम्हाला, हिंदू मतदान कमी होत आहे. मतदान वाढले तर विजय होईल. मी मतदारांची माफी मागतो. तो (खा. इम्तियाज जलील यांचे नाव न घेता) कधी आला का आपल्या वसाहतींमध्ये, आम्ही कधी मुस्लिम बांधवांना हाकलले आहे का? असा सवाल करीत ते म्हणाले, माझा शिवसैनिक माझ्यावर नाराज झाला. माझे काय चुकले? शिवसैनिकांनी काम करायला पाहिजे होते. कुटिल कारस्थान करून भगवा खाली आणला. मी मंत्री होणार होतो, औरंगाबादला मिळणारा मान गेला. मतदानाच्या पोलचिटदेखील शिवसैनिकांनी वाटल्या नाहीत. ज्यांनी कुटिल कारवाया केल्या त्यांचे ईश्वर भले करो. राज्यात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदेपेक्षा माझ्या पराभवाची चर्चा जास्त आहे. एनएच २११ प्रकल्प मी आणला, रेल्वेचे पाच प्रकल्प मंजूर केले, डीएमआयसी आणली, तरीही विकास केला नाही, असा आरोप होतो. आता डीएमआयसीमध्ये काहीही येणार नाही. दोन उद्योग येथून निघून गेले आहेत. नगरसेवक व शाखाप्रमुखांचे भांडण, महिला आघाडीचे भांडण हे असे करू नका. गटबाजी करून आता चालणार नाही. यावेळी घोसाळकर, आ.कायंदे यांनी मनोगत व्यक्त केले. पालकमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटनांची माहिती दिली.
पाप केले असेल तर माफ करा
ह.भ.प.कडे पाहून दु:ख वाटते. तुम्ही त्या ठिकाणी सप्ताह करतात. मी म्हणणार नाही त्यांची दुकानदारी चालते. ह.भ.प.वर दडपण आणले, त्यांना हिंदुत्वावर बोलू दिले गेले नाही. आम्ही जी काही मदत करतो, ती महत्त्वाची असते, त्यावर तुमचा सप्ताह चालतो. ह.भ.प. वर संकट आले तरी ते बोलत नाहीत. ज्यांना-ज्यांना मोठे केले, ते माझ्या विरोधात गेले. याबाबत मला एकदा गोपीनाथ मुंडेदेखील बोलले होते की, खैरे आपले मीठ आळणी आहे काय? मी काही पाप केले असेल, बोललो असेल तर मला माफ करा, असे खैरे म्हणाले. धनगर समाजदेखील वंचित सोबत गेला. इतर जातीदेखील जाण्याची शक्यता आहे, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले.
३५ व्या वर्धापन दिनी शिंदे मुख्यमंत्री
३५ व्या वर्धापन दिनी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, असे भाकीत खैरे यांनी केले. खैरेंचे हे वक्तव्य पक्षातील अंतर्गत चर्चेला धरून होते की, आगामी काळातील युतीच्या राजकारणावर होते. यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
शिवसेना जास्त दिवस टिकणार नाही
शिवसेना जास्त दिवस टिकणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी मनोगत व्यक्त करताना केले. गाडीत फिरणाऱ्यांना पदे वाटल्यानंतर पक्षाचे काय होणार, असा टोलाही त्यांनी लगावला.
चोमड्यांमुळे पराभव झाला
लोकसभा निवडणुकीत खैरेंचा नाहीतर शिवसेनेचा पराभव झाला आहे. चोमडेपणा करणाऱ्यांमुळे हा पराभव झाला असून, त्यांना कशाची मस्ती होती हे समजले नाही, असे आ.संजय शिरसाट म्हणाले.
दोन्ही जिल्हाप्रमुखांना बोलू दिले नाही
जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी यांना मेळाव्यात बोलू दिले नाही. ज्या काही मोजक्या नेत्यांनी भाषण केले, त्यामध्ये जिल्हाप्रमुखांना बोलू न दिल्यामुळे उपस्थित शिवसैनिक व पदाधिकाºयांच्या भुवया उंचावल्या. त्यातच खैरे यांनी संघटनेत फेरबदल करण्याचे संकेत दिल्यामुळे कुजबूज सुरू होती.