युवक महोत्सवाला जाणार का... व्हय महाराजा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:23 AM2017-10-31T00:23:56+5:302017-10-31T00:24:01+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या ‘सृजन २०१७’ या केंद्रीय युवक महोत्सवाच्या दुस-या दिवशी संपूर्ण विद्यापीठ परिसरात मंतरलेले वातावरण होते.

 How to go to the Youth Festival ... Yes Maharaja! | युवक महोत्सवाला जाणार का... व्हय महाराजा!

युवक महोत्सवाला जाणार का... व्हय महाराजा!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या ‘सृजन २०१७’ या केंद्रीय युवक महोत्सवाच्या दुस-या दिवशी संपूर्ण विद्यापीठ परिसरात मंतरलेले वातावरण होते. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी आपापल्या रंगमंचाकडे कूच करण्यास सुरुवात केली. इतके महिने ज्या क्षणासाठी कसून तयारी केली तो आता जवळ आला आहे आणि आपल्याला त्याचे सोने करायचे आहे, या एका ध्येयाने झपाटलेल्या युवा कलावंतांचा उत्साह वर्णनापलीकडचा होता. सोमवारी समूहगायन (भारतीय), वासुदेव, भारुड, गोंधळ, लोक आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन, शास्त्रीय तालवाद्य, एकांकिका, लोकगीत, लोकनाट्य, मृदमूर्तिकला, पोस्टर, चित्रकला, वक्तृत्व आणि प्रश्नमंजूषा (लेखी परीक्षा) या कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सादर केले. कलावंतांबरोबरच त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आलेल्या सहका-यांनीदेखील नाना प्रकारच्या वेशभूषा करून लक्ष वेधून घेतले. बीड, जालना, उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी तर ही संधी म्हणजे अनेक नवीन द्वारे उघडणारी ठरली. मौजमजा, दोस्ती-यारी, टिंगल-टवाळी, गमती-जमती, आवडले तर टाळ्या आणि शिट्या, नाही तर शाब्दिक टपल्या अशा विद्युतभारित वातावरणात दुसरा दिवस पार पडला.
एकांकिकेतून केले सामाजिक प्रश्नांवर भाष्य
विद्यापीठाच्या नाट्यगृहात उभारलेल्या ‘नाट्यरंग’ मंचावर (मंच क्र. ३) विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर आधारित प्रबोधनपर एकांकिका सादर केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या, महिला सबलीकरण, हुंडाबळी अशा ज्वलंत प्रश्नांवर प्रखर भाष्य करण्यात आले. ‘मी तुकड्या बोलतोय’, ‘पारख’, ‘स्वच्छतेकडून समृद्धीकडे’ या एकांकिका विशेष ठरल्या.
जिद्द असेल तर कोणतेही स्वप्न सत्यात उतरविले जाऊ शकते, याची प्रेरणा देणाºया ‘पारख’ एकांकिकेमधून मिनी नावाच्या एका कचरा गोळा करणा-या मुलीची कहाणी सादर करण्यात आली. कॉलेजमध्ये शिकणा-या मुला-मुलींना नाचताना पाहून ती नृत्य शिकते आणि एका मोठ्या स्पर्धेत उतरून आपली कला सादर करते. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या संघाने ही एकांकिका सादर केली.
संत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर आधारित ‘मी तुकड्या बोलतोय’ या एकांकिकेतून समाजात असणाºया भीषण समस्यांवर आपण केवळ चर्चा करतो, त्यांचे समूळ निर्मूलन करण्यासाठी आपण सक्रिय प्रयत्न करीत नसल्याची खंत यातून मांडण्यात आली. शहराच्या प्रगतीमध्ये ग्रामीण भागांकडे दुर्लक्ष होत आहे, हादेखील प्रश्न एकांकिकेतून उपस्थित करण्यात आला. घनसावंगी येथील मॉडल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही एकांकिक ा सादर केली.
‘शेतकरी आत्महत्या’ एकांकिकेतून सावकाराच्या छळामुळे शेतकरी आपल्या कुटुंबियांना मागे सोडून जीवनयात्रा संपविण्यापर्यंत कसा पोहोचतो, याचे विदारक चित्रण करण्यात आले आहे. ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ एकांकिकेतून स्वच्छता अभियानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
शास्त्रीय गायन व तालवाद्याचा सुराविष्कार
‘नादरंग’ (मंच क्र.७) येथे दिवसभर शास्त्रीय गीत आणि शास्त्रीय तालवाद्यांचा सुराविष्कार ऐकायला मिळाला. ‘प्रथम धरू ध्यान श्रीगणेश’ या भिन्न षड्ज रागातील बंदिशीने रसिक मोहित झाले. नोंदणी केलेल्या एकूण २८ महाविद्यालयांपैकी केवळ १२ स्पर्धकांनी शास्त्रीय गायन स्पर्धेत सादरीकरण केले. दुपारच्या सत्रात शास्त्रीय तालवाद्यांची मैफल रंगली. यामध्ये २५ संघांनी नोंदणी केलेली होती.

Web Title:  How to go to the Youth Festival ... Yes Maharaja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.