रक्ताचे नाते निष्ठूर कसे? छत्रपती संभाजीनगरात १०४, तर जिल्ह्यात आढळले ४१ बेवारस मृतदेह
By सुमित डोळे | Published: January 19, 2024 11:16 AM2024-01-19T11:16:15+5:302024-01-19T11:16:15+5:30
मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिस साधारण ६ ते ८ दिवस वाट पाहतात.
छत्रपती संभाजीनगर : माणूस प्रगत होत असतानाच दुसरीकडे कौटुंबिक वाद, जगण्याच्या बदललेल्या पद्धती, मतभेदांतून नात्यांमधला गोडवा हळूहळू कमी होत आहे. एकत्र कुटुंब पद्धती संपत असून, दूर गेलेल्या नात्यांमधला संपर्कदेखील कमी होत आहे. अनेकदा रक्ताच्या नात्यातील व्यक्ती बेपत्ता झाल्याची, मृत्युमुखी पडल्याची दखलदेखील घेतली जात नाही. गेल्या वर्षभरात शहर, जिल्ह्यात एकूण १४५ बेवारस मृतदेह आढळले. जिवंतपणीच कुटुंबाने दूर केलेल्या व्यक्तींची मृत्यूनंतरदेखील हेळसांड होते. त्यांच्या कुटुंबाचा शोध घेण्यापासून अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी मात्र पोलिस विभाग प्रामाणिकपणे पार पाडतो.
कोणत्या महिन्यात किती अनोळखी मृतदेह आढळले ?
महिना अनोळखी मृतदेह (शहर)
जानेवारी ५
फेब्रुवारी १३
मार्च ६
एप्रिल ५
मे ११
जून ७
जुलै १२
ऑगस्ट ८
सप्टेंबर ८
ऑक्टोबर १३
नोव्हेंबर ८
डिसेंबर ८
एकूण १०४
ग्रामीण भागात प्रमाण कमी
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मात्र अनोळखी मृतदेह आढळण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षाही कमी आहे. २०२३ मध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण ४१ मृतदेह आढळले. यात सर्वाधिक मे महिन्यात ११, जूनमध्ये ७ व डिसेंबरमध्ये सहा मृतदेह आढळले.
७५ टक्के मृत्यू अनैसर्गिकच
शहरात आढळलेल्या १०४ मृतदेहांपैकी ७९ मृत्यू हे अनैसर्गिक होते. ग्रामीण भागात ४१ पैकी ३३ अनोळखी व्यक्तींचे मृत्यू अनैसर्गिक निष्पन्न झाले.
काय केले जाते या अनोळखी मृतदेहांचे?
अनोळखी मृतदेह आढळल्यानंतर मृत्यूच्या कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन केले जाते. पोलिस शासकीय संकेतस्थळ, माध्यमांद्वारे ती माहिती प्रसिद्ध करतात.
किती दिवस पाहिली जाते वाट ?
मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिस साधारण ६ ते ८ दिवस वाट पाहतात. सामान्यत: रेल्वे अपघातात ओळख पटविण्यात अडचणी येतात. अन्य घटनांमध्ये कुटुंबीय सापडतात. मृतदेह कुजण्याच्या अवस्थेत असल्यास तत्काळ अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कारासाठी सामाजिक संस्थांना आवाहन केले जाते, तर काही प्रसंगांत पोलिस अनुदानातूनदेखील ते पार पाडले जाते, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.
घाटी रुग्णालय परिसरात सर्वाधिक मृतदेह
शहरात आढळलेल्या अनोळखी मृतदेहांपैकी ३८ पेक्षा अधिक मृतदेह एकट्या घाटी रुग्णालयाच्या परिसरात आढळले. उपचारांसाठी आणल्यानंतर कुटुंबीय रुग्णांना तसेच सोडून जातात. त्यामुळे येथेच सर्वाधिक मृतदेह आढळत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.