वर्षभरात अपघातात १९७ जणांचा मृत्यू; जीव घेणारे वाहनचालक किती दिवस अज्ञात राहणार?
By राम शिनगारे | Published: January 31, 2024 11:25 AM2024-01-31T11:25:02+5:302024-01-31T11:30:02+5:30
वाहनांची वर्दळ असल्यामुळे अपघातानंतर पळून जाणारे चालक सापडतच नाहीत.
छत्रपती संभाजीनगर : देशभरात अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे अपघात झाल्याची घटना उघडकीस येत असते. त्यात जीव गमावणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे वारंवार आवाहन केले जाते. शासन वेळोवेळी नियमांमध्ये बदल करीत असते. तरीही अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ‘हिट ॲण्ड रन’ कायदा आणला आहे. त्यानुसार अपघातानंतर चालक पळून गेल्यास त्यास दहा वर्षांपर्यंत कारावास आणि ७ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलिसांनाही पळून जाणारे वाहनचालक शोधून काढावे लागणार आहेत.
वर्षभरात १८७ प्राणांतिक अपघात
छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत २०२३ या वर्षात तब्बल १८७ प्राणांतिक अपघात घडले आहेत. हाच आकडा ग्रामीण भागात त्यापेक्षा अधिक आहे.
१९७ जणांचा मृत्यू, ४१९ गंभीर
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मागील वर्षी झालेल्या ६०० अपघातांमध्ये १९७ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्याच वेळी अपघातात जखमी झालेल्यांची संख्या ही ४१९ एवढी आहे. २०२२ मध्ये अपघातातील मृत्यू झालेल्यांची संख्या १९९ होती. तर जखमींची संख्या ३७० एवढी होती. मृतांची संख्या २०२३ या वर्षात २ ने घटली असली तरी जखमींची संख्या ४९ ने वाढली आहे.
अज्ञात चालक सापडतच नाहीत
अनेक अपघात हे सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणी होतात. दुचाकीस्वरास उडवून मोठी वाहने निघून जातात. त्याच मार्गावरून वाहनांची वर्दळ असल्यामुळे अपघातानंतर पळून जाणारे चालक सापडतच नाहीत. घटनेला काही दिवस उलटून गेल्यानंतर तपास यंत्रणांचेही दुर्लक्ष होते.
हिट ॲण्ड रन कायदा काय आहे?
सध्याचा कायदा : भारतीय दंड संहितेतील (आयपीसी) तरतुदीनुसार अपघाताच्या प्रकरणात चालकाची ओळख पटल्यानंतर निष्काळजीपणे वाहन चालवणे २७९, निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ३०४ ए आणि जीव धोक्यात घालणे ३३८ या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात येत होता. या नोंदीनुसार २ वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. त्यात आरोपीला तत्काळ जामीन मिळत आहे.
केलेले बदल : आयपीसी कायदा बदलून भारतीय न्याय संहिता हा कायदा संसदेत मंजूर केला आहे. त्यातील तरतुदीनुसार अपघातानंतर चालकाने थांबून जखमींना मदत केल्यास त्यात कमी शिक्षेची तरतूद आहे; मात्र अपघातानंतर चालक पळून जातो. अशा प्रकरणात ‘हिट ॲण्ड रन’ कायद्यानुसार चालकाला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची व ७ लाख रुपये आर्थिक दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.