किती आयुक्तांना पिटाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:30 AM2017-11-23T00:30:26+5:302017-11-23T00:30:31+5:30
औरंगाबाद महापालिकेत आयुक्तच टिकत नाहीत, अशी ख्याती आता शहरभर नव्हे, तर राज्यपातळीवर जाऊन पोहोचली आहे. येथे कायमस्वरूपी आयुक्त टिकून राहावेत यासाठी काय करावे, असा प्रश्न नगरविकास विभागाच्या अधिकाºयांना पडला आहे. १९८२ पासून २०१७ पर्यंत महापालिकेला तब्बल २६ आयुक्त प्राप्त झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेत आयुक्तच टिकत नाहीत, अशी ख्याती आता शहरभर नव्हे, तर राज्यपातळीवर जाऊन पोहोचली आहे. येथे कायमस्वरूपी आयुक्त टिकून राहावेत यासाठी काय करावे, असा प्रश्न नगरविकास विभागाच्या अधिकाºयांना पडला आहे. १९८२ पासून २०१७ पर्यंत महापालिकेला तब्बल २६ आयुक्त प्राप्त झाले. त्यातील ७ जणांना राजकीय मंडळींनी अक्षरश: पिटाळून लावले आहे, काहींनी तर परिस्थितीचा अंदाज घेऊन अवघ्या काही दिवसांमध्येच बदली करून घेतली आहे.
महापालिकेत सध्या आयुक्तपद संगीत खुर्चीसारखे झाले आहे. मागील आठवड्यात पूर्णवेळ लाभलेले आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मुसरी येथील प्रशिक्षणानंतर परत मनपात येणार नाही, असे सांगितले आहे. त्यांना ऐनवेळी कुठे नेमणूक द्यावी, असा प्रश्न प्रधान सचिवांना पडला असून, त्यांच्या जागी कोणाची नेमणूक करावी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. महापालिकेत आयुक्त का टिकत नाही, यावर एक मोठे संशोधनही होऊ शकते. १९९१ पासून आजपर्यंत दोन आयुक्तांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. त्यात असीमकुमार गुप्ता आणि डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचा समावेश होतो. उर्वरित आयुक्तांनी बोटावर मोजण्याएवढ्या महिन्यांतच बदली करून घेतली. काहींना बदली करून घेण्यास भाग पाडण्यात आले. राजकीय मंडळींनी आपले ‘व्हील पॉवर’वापरून काही आयुक्तांच्या बदल्या करून घेतल्या. मागील दोन दशकांतील आयुक्तांचा प्रवास त्यांच्यासोबत झालेल्या घडलेल्या घटनांचा आढावा घेतला, तर एक रंजक इतिहास उभा राहतो. मनपातील राजकीय मंडळींना आयुक्त नको असल्यास राजकीय गॉडफादरचा आधार घेण्यात येतो.
अन्यथा प्रकाश महाजन यांच्यावर तर सेना-भाजप, एमआयएम नगरसेवकांनी मिळून अविश्वास ठराव पारित करून त्यांची बदली केली होती. विद्यमान आयुक्त मुगळीकर यांच्याबद्दल एकही तक्रार नव्हती. अचानक त्यांना मनपा नको म्हणण्याची वेळ का आली. हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.