एका सहीसाठी ‘आरटीओ’त किती चकरा? ३ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात ‘प्रभारीराज’

By संतोष हिरेमठ | Published: May 27, 2023 07:49 PM2023-05-27T19:49:22+5:302023-05-27T19:50:26+5:30

प्रभारी कधी जालन्यात, कधी बीडला, तर कधी बैठकीला; वाहनधारकांनी ठोठावले आमदारांचे दार

How many rounds in RTO for one signature? 'In charge' for 3 years, vehicle owners are suffering in Chhatrapati Sambhajinagar | एका सहीसाठी ‘आरटीओ’त किती चकरा? ३ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात ‘प्रभारीराज’

एका सहीसाठी ‘आरटीओ’त किती चकरा? ३ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात ‘प्रभारीराज’

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात ६७ वर्षांत प्रथमच तब्बल ३ वर्षांपासून ‘प्रभारीराज’ सुरू आहे. जालना उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारीपदाचा कारभार आहे. प्रभारींना छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड कार्यालयांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्यामुळे कधी या कार्यालयात, तर कधी त्या कार्यालयात हजर राहावे लागते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. या सगळ्यांचा फटका वाहनधारकांना बसत असून, कागदपत्रांवर अधिकाऱ्यांची एक सही घेण्यासाठी वारंवार चकरा मारण्याची वेळ वाहनधारकांवर ओढावत आहे.

आरटीओ कार्यालयाला २०२० पासून पूर्णवेळ प्रादेशिक परिवहन अधिकारी मिळालेले नाही. या पदावर प्रभारी अधिकारी देऊन ‘संगीत-खुर्ची’ खेळली जात आहे. गेल्या ३ वर्षांत ३ अधिकाऱ्यांकडे या पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला. मोटार वाहन निरीक्षक सध्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदाचा ‘कारभार’ सांभाळत असल्याचीही परिस्थिती आहे. कार्यालयात पूर्ण अधिकारीच नसल्याने सोमवारी अनेक वाहनधारक, प्रतिनिधींनी आमदारांकडे जाऊन गाऱ्हाणे मांडले.

ऑफलाइन कामांचा खोळंबा
प्रभारी अधिकारी कधी जालना, कधी बीड कार्यालय, तर कधी बैठकीला जातात. अनेक कामे ऑफलाइन करावी लागतात. त्यासाठी अधिकाऱ्यांची कागदपत्रांवर सही घ्यावी लागते; परंतु त्यासाठी वाहनचालकांना अनेक चकरा माराव्या लागत आहेत.
- संतोष मरमट

दोन दिवसांत ऑर्डर निघेल
परिवहन आयुक्तांशी बोलणे झाले आहे. दोन दिवसांत पूर्णवेळ आरटीओ अधिकाऱ्यांची ऑर्डर निघणार आहे. सध्याचे अधिकारी जागेवर बसत नाहीत. आरटीओ कार्यालयात वाहनधारकांचे हेलपाटे वाढले आहेत.
- आ. संजय शिरसाट

यापूर्वी कोणाकडे, कधी, किती दिवस अतिरिक्त पदभार
प्रभारी आरटीओ : कार्यकाळ
- सी. एम. सोनटक्के : १० जुलै २००४ ते ९ सप्टेंबर २००४
- डी. टी. पवार : १ मार्च २०१३ ते २८ नोव्हेंबर २०१३
- अमर पाटील : १ जुलै २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७
- अमर पाटील : १ जुलै २०२० ते १९ जुलै २०२०
- संजय मेत्रेवार : २० जुलै २०२० ते १ डिसेंबर २०२२
- विजय काठोळे : १ डिसेंबर २०२२ पासून ते आतापर्यंत

Web Title: How many rounds in RTO for one signature? 'In charge' for 3 years, vehicle owners are suffering in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.