‘सरकारला अजून किती आत्महत्या हव्यात आहेत ?’
By Admin | Published: November 16, 2014 11:10 PM2014-11-16T23:10:10+5:302014-11-16T23:40:00+5:30
बीड : संपूर्ण मराठवाड्यात पीक पाण्याची अतिशय वाईट स्थिती आहे. पाणी नाही, पिके गेली आता फक्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उरले आहे.
बीड : संपूर्ण मराठवाड्यात पीक पाण्याची अतिशय वाईट स्थिती आहे. पाणी नाही, पिके गेली आता फक्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उरले आहे. अशी सारी परिस्थिती असताना भाजपाचे सरकार मात्र दुष्काळ जाहीर करीत नाही. हे सरकार आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट पाहणार आहे? असा सवाल विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी केला.
ते रविवारी जिल्ह्याचा दुष्काळ पाहण्यासाठी आले होते. त्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुरंदरचे आ. विजय शिवतरे, आ. सदा सरवदे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांची उपस्थिती होती. शिंदे म्हणाले की, बीड जिल्ह्यात सिंचनाचा मोठ्याप्रमाणात अभाव आहे. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ मदत झाली पाहिजे. मदतीच्या दुष्टीकोनातून राज्य सरकार कुठलीच पावले उचलत नसल्याचे पहावयास मिळत आहे. शासनाने अद्याप पर्यंत जनावरांच्या चाऱ्याची देखील व्यवस्था केलेली नाही. दोन दिवसापुर्वी शासनाने आणेवारी काढली. ही आणेवारी बोगस आहे. ब्रिटीश कालीन पध्दतीने ही आनेवारी काढली जात आहे. आणेवारी काढण्याची पध्दत बदलून नवीन पध्दत लागू करावी, अशी मागणी करत शिंदे पुढे म्हणाले की, मी बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, येथील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. शासन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी असते. मात्र हे सरकार दुष्काळ निवारणासाठी कुठलेच ठोस पावले उचलत नाही असा आरोप शिंदे यांनी केला. यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब अंबूरे, सचिन मुळूक, पं. स. सदस्य विलास महाराज शिंदे, पंकज कुटे, विपुल पिंगळे, सुशील पिंगळे आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)