किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ? जिल्हा परिषद, शिक्षण संचालकांचे वेगवेगळे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 03:41 PM2021-06-18T15:41:49+5:302021-06-18T15:59:12+5:30

सध्या ग्रामीण भाग कोरोनाच्या टप्पा क्रमांक तीनमध्ये असल्याने काही निर्बंध अद्याप आहेत, तर शहर पहिल्या टप्प्यात असल्याने येथील सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

How many teachers want to go to school, brother? Various orders of Zilla Parishad, Director of Education | किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ? जिल्हा परिषद, शिक्षण संचालकांचे वेगवेगळे आदेश

किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ? जिल्हा परिषद, शिक्षण संचालकांचे वेगवेगळे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात ४ हजार ५५५ शाळा आहेत. त्यापैकी ९७२ शाळा महाविद्यालये ही महापालिका क्षेत्रातील असून उर्वरित शाळा ग्रामीण भागातील आहेत. शिक्षण संचालकांकडून १४ जूनच्या रात्री उशिरा काढलेले पत्र आणि सीईओंनी काढलेल्या पत्रावरून शिक्षकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

औरंगाबाद : राज्यातील शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. शिक्षकांच्या उपस्थितीबाबत दोन पत्रके निघाल्याने गोंधळ उडाला. शिक्षण संचालकांनी ५० टक्के उपस्थिती, तर जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या सूचनेनुसार १०० टक्के उपस्थिती अनिवार्य म्हटली आहे. त्यामुळे किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ? असा प्रश्न शिक्षकांतून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात ४ हजार ५५५ शाळा आहेत. त्यापैकी ९७२ शाळा महाविद्यालये ही महापालिका क्षेत्रातील असून उर्वरित शाळा ग्रामीण भागातील आहेत. सध्या ग्रामीण भाग कोरोनाच्या टप्पा क्रमांक तीनमध्ये असल्याने काही निर्बंध अद्याप आहेत, तर शहर पहिल्या टप्प्यात असल्याने येथील सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. कोरोनाचा कहर कमी होत असताना शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून सुरुवात झाली. मात्र, शिक्षण संचालकांकडून १४ जूनच्या रात्री उशिरा काढलेले पत्र आणि सीईओंनी काढलेल्या पत्रावरून शिक्षकांत संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्या आदेशाचे निकष पाळावेत आणि किती शिक्षक, कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहावे, याबद्दल साशंकता आहेच. शिवाय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय अशा स्वरूपाच्या शाळा आहेत. त्याप्रमाणे शिक्षक उपस्थितीबद्दल निर्देश मिळणे अपेक्षित असल्याने शिक्षकांतून प्रश्न उपस्थित होत आहे. दहावीच्या मूल्यांकनाचे काम, वर्ग सुरू करण्याची तयारी यात निकालाच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता काही शिक्षक, मुख्याध्यापकांकडून व्यक्त होत आहे.

शिक्षण संचालकांचे पत्र
पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गाचे सर्व शाळा महाविद्यालयांत ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील. दहावी व बारावीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती १०० टक्के अनिवार्य राहील. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

जिल्हा परिषद सीईओंचे पत्र
ग्रामीण भागात ५० टक्के कर्मचारी उपस्थितीने कार्यालय सुरू करण्याचे निर्देश असल्याने ग्रामीण भागात सर्व शाळांमध्ये ५० टक्के शिक्षकांची पूर्णवेळ उपस्थिती. महानगरपालिका क्षेत्रात १०० टक्के शिक्षक शाळांमध्ये पूर्णवेळ उपस्थित राहतील. याबाबत नियोजन करण्याचे आदेश सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांनी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिले होते.

अंमलबजावणी सोमवारपासून

शाळा सुरू करण्यासह उपस्थितीसंदर्भात १४ जूनला सीईओंनी आदेश दिले. तोपर्यंत शिक्षण संचालकांचे आदेश मिळालेले नव्हते. त्यामुळे सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या. रात्री उशिरा शिक्षण संचालकांचे आदेश प्राप्त झाले. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाईल. दहावी-बारावीचे शिक्षक १०० टक्के आणि इतर वर्गांचे शिक्षक ५० टक्के, यानुसार शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश सोमवारपूर्वी देऊ.
- सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी,

शिक्षकांची कसरत
शाळा ५० टक्के शिक्षकांच्या उपस्थितीने सुरू झाल्या असल्या तरी, ज्येष्ठ आणि दिव्यांग शिक्षक वगळता ९५ टक्के शिक्षकांना गावात सर्वेक्षण आणि त्याच्या रिपोर्टिंगचे काम सुरूच आहे. ते काम करून उपस्थितीच्या या घोळात शिक्षकांना कसरत करावी लागत आहे.
- प्रकाश दाणे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती

दोन आदेशांमुळे संभ्रमावस्था

शिक्षकांच्या उपस्थितीबद्दलच्या दोन आदेशांमुळे शिक्षकांत संभ्रमावस्था आहे. पहिली ते चाैथी, पाचवी ते आठवी, आठवी ते दहावी आणि अकरावी, बारावी असे शाळा महाविद्यालयांचे स्वरूप आहे. त्यामुळे शाळांच्या स्वरूपानिहाय शिक्षक उपस्थितीबद्दल आदेश देणे गरजेचे होते. पाचवी ते दहावी, आठवी ते बारावीपर्यंतही अनेक शाळा आहेत. तिथे दहावी आणि बारावीच्या १०० टक्के उपस्थितीबद्दल संभ्रम आहे.
- प्रा. मनोज पाटील, जिल्हाध्यक्ष, शिक्षक क्रांती

जिल्ह्यातील शाळा - ४,५५५
जिल्हा परिषदेच्या शाळा - २१३१
अनुदानित शाळा - ९६५
विनाअनुदानित शाळा - १३३९
शासनाच्या शाळा - १३
महानगरपालिकेच्या शाळा - ८८
नगरपालिका, परिषद पंचायतच्या शाळा - १९
शिक्षक - ३२,९२५
शिक्षकेतर कर्मचारी - १०,५००

Web Title: How many teachers want to go to school, brother? Various orders of Zilla Parishad, Director of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.