घरपोच गॅस सिलिंडरसाठी तुम्ही जास्तीचे किती पैसे मोजता ? कोणी खुशीने तर कोणी...
By प्रशांत तेलवाडकर | Published: February 29, 2024 03:46 PM2024-02-29T15:46:16+5:302024-02-29T15:47:05+5:30
डिलिव्हरी बॉय मागतात जास्तीची रक्कम
छत्रपती संभाजीनगर : घरगुती गॅस सिलिंडरची किंमत जाहीर होते तेव्हा त्यात घरपोच सिलिंडर पोहोचविण्याची रक्कम घेतली जाते. यामुळे डिलिव्हरी बॉयला जास्तीची रक्कम देण्याची गरज नाही. कारण, कोणतीही अतिरिक्त रक्कम न देता गॅस एजन्सीने घरपोच सिलिंडर द्यावे, असे आदेश सरकारचे व गॅस कंपन्यांचे आहेत. मात्र, असे असताना शहरात काही डिलिव्हरी बॉय ग्राहकांकडून जास्तीच्या रकमेची मागणी करतात. त्यासाठी अनेक वेळा ग्राहकांशी वादही घालतात. कोणी वाद नको म्हणून जास्त रक्कम देतात किंवा काही जण खुशीनेही ‘टिप’ देतात.
२९ रुपये जास्तीचे घेतात
सध्या घरगुती सिलिंडरचे दर ९११.५० रुपये आहेत. मात्र, काही डिलिव्हरी बॉय ग्राहकांकडून १०३० ते १०४० रुपये घेतात. म्हणजे सिलिंडरमागे १९ ते २९ रुपयांपर्यंत जास्त रक्कम ग्राहकांना द्यावी लागते.
३.२६ रुपयांची सबसिडी
केंद्र सरकार प्रत्येक सिलिंडरच्या मागे सबसिडी देत असते. आजघडीला प्रत्येक सिलिंडरमागे ३.२६ रुपयांची सबसिडी ग्राहकांच्या खात्यात जमा होत आहे.
तक्रार कोठे कराल ?
डिलिव्हरी बॉय सिलिंडरच्या किमतीपेक्षा जास्त रक्कम मागत असेल तर त्याची तक्रार संबंधित गॅस एजन्सीकडे करावी. कारवाई नाही झाली तर संबंधित गॅस कंपनीकडे किंवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते.
म्हणून आम्ही देतो जास्तीचे पैसे
आम्ही रो हाऊसमध्ये राहतो. तरी पण डिलिव्हरी बॉय सिलिंडरच्या किमतीपेक्षा जास्तीची रक्कम मागतात. वरील रक्कम दिली नाही तर पुढील वेळीस सिलिंडर उशिरा आणून देईल, या भीतीने आम्ही जास्तीचे पैसे देतो.
- वनिता मोरे, गृहिणी, बीड बायपास
अनेकदा होतात वाद
जाहीर झालेल्या किमतीप्रमाणेच पावती दिली जाते. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त रक्कम डिलिव्हरी बॉयला द्यावी लागते. यासाठी अनेकदा वादही झाले. आम्ही वरच्या मजल्यावर सिलिंडर आणून देतो, त्यामुळे जास्त पैसे घेतो, असे डिलिव्हरी बॉय सांगतात.
- सायली जोशी,गृहिणी, गारखेडा