छत्रपती संभाजीनगरात जलकुंभ किती? एवढ्या उंचीवर जाऊन केव्हा करतात स्वच्छ?
By मुजीब देवणीकर | Published: July 18, 2024 02:43 PM2024-07-18T14:43:38+5:302024-07-18T14:48:56+5:30
जलकुंभावरच स्वच्छ केल्याच्या प्रत्येक ठिकाणी ठेवल्या जातात नोंदी
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सुमारे १५ लाख नागरिकांची तहान महापालिकेच्या पाण्यावर भागते. त्यासाठी शहरात ३६ जलकुंभांचा वापर करण्यात येतो. हे उंच जलकुंभ कधी स्वच्छ होतात, असा प्रश्न पडतो. गढूळ पाणी आल्यावर नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येतात. महापालिकेकडून दर तीन महिन्यांनी जलकुंभांची स्वच्छता केली जाते.
शहरात काही वसाहतींना पाचव्या तर काही वसाहतींना दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. जायकवाडीहून शहरात दररोज १३० एमएलडी पाणी येते. वेगवेगळ्या जलकुंभांवर हे पाणी आणण्यात येते. तेथून टप्पे पाडून नागरिकांना पाणी देण्यात येते. पहाटे ४ वाजेपासून पाणीपुरवठ्याचे टप्पे सुरू होतात. रात्री १:०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात पाणी आणण्यापूर्वी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातच पाणी स्वच्छ केले जाते. त्याच ठिकाणी क्लोरिन किती टाकावे, हे निश्चित केले जाते. महापालिकेकडून पाणीपुरवठा आठवड्यातून एकदा होतो, यावर नागरिकांचा प्रचंड रोष आहे. मात्र, पाण्याच्या गुणवत्तेवर नागरिकांनी कधीच प्रश्न उपस्थित केला नाही. काही वसाहतींमध्ये ड्रेनेजमिश्रित पाणी येते. काही ठिकाणी गढूळ पाणी येते. जलवाहिन्यांचे लिकेज, ड्रेनेजचे लिकेज निदर्शनास येताच मनपाकडून दूरही केले जातात.
शहरात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या किती?
शहरात महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बांधलेल्या एकूण ३६ पाण्याच्या टाक्या आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेत आणखी नवीन ५३ पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसांत शहरात जवळपास ८९ ते ९० जलकुंभ दिसून येतील.
किती दिवसांनंतर होते स्वच्छता?
शहरातील पाण्याचे जलकुंभ प्रत्येक तीन महिन्यांनी स्वच्छ केले जातात. प्रत्येक जलकुंभात धुतलेले गढूळ पाणी काढण्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे. तीन पाण्याद्वारे जलकुंभ स्वच्छ केले जाते. शेवटी क्लोरिनच्या पाण्याचा वापर होतो.
कोणाकडून केली जाते स्वच्छता?
महापालिकेचे कामयस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचारी प्रत्येक तीन महिन्याला जलकुंभ कोरडा झाला तर सफाई करतात. जलवाहिनी फुटलेली असेल तेव्हा ही कामे उरकली जातात.
घाण पाण्याला जबाबदार कोण?
काही भागात ड्रेनेज-जलवाहिन्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे अनेकदा दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तक्रार येताच खोदकाम करून लिकेज बंद केले जातात. ही निरंतर प्रक्रिया असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य
शहरातील जलकुंभ नियमितपणे स्वच्छ करण्यात येतात. किमान ३ महिन्यांतून एकदा जलकुंभ स्वच्छ करण्याचे निर्देश आहेत.
- के. एम. फालक, कार्यकारी अभियंता.