किती ही महागाई? माणसांवर आता कोंबड्यांसाठीची ज्वारी खाण्याची वेळ, दरांत विक्रमी वाढ

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 14, 2022 04:22 PM2022-11-14T16:22:33+5:302022-11-14T16:23:40+5:30

अन्नधान्याच्या दरांत विक्रमी महागाई, आता सर्वसामान्यांवर मिलबर गहू, पशुखाद्याची ज्वारी खाण्याची वेळ

How much is this inflation? Time for humans to eat sorghum for chickens | किती ही महागाई? माणसांवर आता कोंबड्यांसाठीची ज्वारी खाण्याची वेळ, दरांत विक्रमी वाढ

किती ही महागाई? माणसांवर आता कोंबड्यांसाठीची ज्वारी खाण्याची वेळ, दरांत विक्रमी वाढ

googlenewsNext

- प्रशांत तेलाडकर
औरंगाबाद :
गहू ३१ ते ५२ रुपये, ज्वारी ४५ ते ५२ रुपये आणि बाजारी २८ ते ३० रुपये किलो... हे भाव वाचून तुमचे डोके चक्रावले असेल... या तर मोंढ्यातील होलसेल विक्रीच्या किमती आहेत. किरकोळ बाजारात किलोमागे २ ते ५ रुपये जास्त मोजावे लागतात. स्वातंत्र्यानंतर इतिहासात अन्नधान्याचे दर एवढे महागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचा दावा केला जात असला तरी आजघडीला शेतकऱ्यांकडे धान्यसाठा नाही. बडे साठेबाज व्यापारी व कॉर्पोरेट कंपन्यांची चांदी झाली आहे. दुसरीकडे आता शरबती, लोकवन गहू दूरच आता ‘मिलबर’ हलक्या प्रतीच्या गव्हाची पोळी खाण्याची वेळ आली आहे. ‘आता आम्ही पोळी, भाकरी खायची नाही का,’ असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक सरकारला विचारत आहेत.

निर्यात झाली दुप्पट
चालू वर्षात आतापर्यंत ४६ लाख टन गव्हाची निर्यात केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील गहू, ज्वारी, बाजरी आदी भरडधान्ये; तसेच रवा, मैदा, आटा यांनाही जगभरातून मागणी होत आहे. कॉर्पोरेट कंपन्यांनी हंगामात कमी भावात गव्हाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. तेच आता चढ्या दराने गहू निर्यात करीत आहेत.

मिलबर गहू २७ ते २८ रुपये किलो
मिलबर हा सर्वांत हलक्या दर्जाचा गहू. तो फक्त आटा, मैदा तयार करण्यासाठी वापरण्यात येतो. एरव्ही या गव्हाचे दर क्विंटलमागे १,८०० ते २,२०० रुपये असतात. आता त्याचे भाव २,७०० ते २,८०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. मिनी शरबती, लोकवन गहू ३,१०० ते ३,६०० रुपये, तर प्युअर शरबती गहू ४,८०० ते ५,२०० रुपये क्विंटल दराने खरेदी करावा लागत आहे. मागील वर्षी शरबती गव्हाचा दर ४,००० ते ४,५०० रुपये क्विंटल होता.

चार महिन्यांत ज्वारी ४० टक्क्यांनी महागली
पूर्वी ज्वारीची भाकरी गरीब खात होते, पण आता ज्वारीचे महत्त्व श्रीमंतांनाही पटले आहे. चार वर्षांपूर्वी कमी उत्पादनामुळे ज्वारीचे दर ४,५०० ते ५,००० रुपये क्विंटलपर्यंत होते. हा विक्रम मोडीत काढीत सध्या ४,५०० ते ५,२०० रुपयांदरम्यान ज्वारी विकली जात आहे. मागील चार महिन्यांत भाव ४० टक्क्यांनी वाढले आहेत.

बाजरीचे भाव पाहूनच ग्राहकांना भरतेय हुडहुडी
बाजरीची भाकरी उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात आवर्जून खाल्ली जाते. मात्र, यंदा परतीचा पावसाचा मोठा फटका महाराष्ट्रसह, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील बाजरीच्या पिकाला बसला. बाजारात विक्री येत असलेली ६० ते ७० टक्के बाजरी काळसर पडलेली आहे. ही बाजरी चक्क २,४०० ते २,५५० रुपये क्विंटल दराने विकली जात आहे. या बाजरीचा वापर पशुखाद्यासाठी केला जात आहे. चांगल्या दर्जाच्या० क्विंटलभर बाजरीसाठी २,८०० ते ३,००० रुपये मोजावे लागत आहेत.

आणखी भाव वाढतील
केंद्र सरकारने निर्यात थांबवली नाही व अशीच परिस्थिती राहिली तर गहू, ज्वारीचे भाव आणखी वाढतील. कारण, हे धान्य साठेबाज व कार्पोरेट कंपन्यांच्या हातात आहेत. याच बड्या कंपन्या आटा, मैदा तयार करून मोठा नफा कमवत आहेत. मात्र, सर्वसामान्यांचा संताप व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे; तसेच या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांनाही होत नाही. कारण त्यांनी गहू, ज्वारी मार्च-एप्रिलमध्ये कमी दरात विकली आहे.
- नीलेश सोमाणी, होलसेल व्यापारी.

Web Title: How much is this inflation? Time for humans to eat sorghum for chickens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.