किती ही लूट? जाधवमंडीत गवार ३० रुपये, तर घराजवळ ५० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:05 AM2021-07-30T04:05:11+5:302021-07-30T04:05:11+5:30

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : जाधववाडीतील आडत बाजारापेक्षा दुप्पट, तिप्पट भावात शहरातील अन्य भाजीमंडईत भाज्यांची विक्री होते. शेतकऱ्यांपेक्षा विक्री साखळीतील ...

How much loot? In Jadhavmandi, guar costs Rs 30, while near home it costs Rs 50 per kg | किती ही लूट? जाधवमंडीत गवार ३० रुपये, तर घराजवळ ५० रुपये किलो

किती ही लूट? जाधवमंडीत गवार ३० रुपये, तर घराजवळ ५० रुपये किलो

googlenewsNext

प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : जाधववाडीतील आडत बाजारापेक्षा दुप्पट, तिप्पट भावात शहरातील अन्य भाजीमंडईत भाज्यांची विक्री होते. शेतकऱ्यांपेक्षा विक्री साखळीतील व्यापारीच ‘मलाई’ कमवून घेतात. ना शेतकऱ्याला जास्त किंमत मिळते ना ग्राहकांना योग्य दरात भाज्या मिळतात.

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ, भाज्यांच्या आडत बाजारात जिल्ह्यासह परजिल्हा तसेच परराज्यातून भाज्यांची आवक होत असते. आडत बाजारात पूर्वी भाजी विकल्यावर शेतकऱ्यांकडून ६ टक्के आडत वसूल केली जात होती. मात्र, आता खरेदीदाराकडून आडत वसूल केली जात आहे. तरी शेतकऱ्यांना अपेक्षीत भाव अजूनही मिळत नाही. जाधववाडीत आडत बाजारात ज्या भावात खरेदीदार आडत्याकडून भाज्या खरेदी करतात. त्यापेक्षा दुप्पट, तिप्पट भावात ते मंडईत किंवा हातगाड्यांवर विकतात. बाजारपेठेतील ही दलालांची साखळी तोडण्याचा मध्यंतरी प्रयत्न झाला. काही शेतकऱ्यांनी थेट घरपोच भाज्या विक्री सुरु केली होती. मात्र, यात सातत्य नसल्याने हा प्रयोग यशस्वी झाला नाही. यामुळे ग्राहकांना हातगाडीवर किंवा थेट जवळच्या भाजी मंडईत जाऊन भाजी खरेदी शिवाय पर्याय नाही. कोरोनानंतर परिस्थिती बदलली व भाजी विक्रीचे विक्रेंद्रीकरण झाले. शहरातील प्रत्येक चौकात भाजी विक्रेते बसत असून प्रत्येक भाजीमंडईत भाज्यांचे भावही वेगवेगळे असल्याने भाज्यांचे नेमके दर काय, असाच प्रश्न ग्राहकांना पडत आहे.

चौकट

हडकोत कारले २० रुपये, शाहागंजमध्ये ४० रुपये किलो

जाधववाडीत आडत बाजारात गुरुवारी ७०० ते १५०० रुपये क्विंटलने कारले विक्री झाले. हडको मयुरपार्क येथे २० ते २५ रुपये किलो तर शहागंज परिसरात ३० ते ४० रुपये किलोने विकल्या जात होते. शिमला मिर्ची जाधववाडीत १० रुपये किलो तर केळीबाजार रोडवर २५ ते ३० रुपये तर रेल्वेस्टेशन रोडवर ३० ते ४० रुपये किलोपर्यंत विकली जात होती.

--

चौकट

१) भाजीपाला जाधववाडी (प्रति किलो) शहागंज२

२) टोमॅटो ५ ते १५ रु. २० ते ३० रु

३) भेंडी १७ ते २० रु. ३० ते ४० रु.

४) वांगे १० ते १५ रु ३० ते ४० रु

५) शिमला मिरची ८ ते १० रु. ३० ते ४० रु.

६) गवार १५ ते ३० रु. ४० ते ५० रु.

७) कारले ७ ते १५ रु. ३० ते ४० रु.

८) दोडके १५ ते २० रु. ३० ते ४० रु.

९) बटाटा १० ते १३ रु १५ ते २० रु

१०) कांदे ५ ते २० रु. २० ते २५ रु.

११) फुलगोबी ८ ते १५ रु. ३० ते ४० रु.

----------------------

चौकट

पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात

कांदा जाधववाडीत विक्रीला आणल्यावर शेतकऱ्याच्या हातात किलोमागे १५ ते २० रुपये मिळतात. यात त्यास वाहनभाडे द्यावे लागते. आडत्या खरेदीदाराकडून ६ टक्के कमिशन वसूल करतो. किलोमागे १ रुपया ६० पैशापर्यंत कमिशन जाते. याच कांद्याची ३ प्रकारात वर्गवारी करून विक्रेते २५ ते ३० रुपये किलोपर्यंत कांदा विकतात. कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना जेवढी रक्कम मिळते त्यापेक्षा कमी मेहनत घेऊन अधिक रक्कम विक्रेते कमवितात.

---

चौकट

एवढा फरक कसा?

सर्वांना विक्रेते जास्त दरात भाज्या विकताना दिसतात पण आडतमध्ये भाजी खरेदी केल्यानंतर आम्हाला ६ टक्के कमिशन, हमाली, लोडिंगरिक्षा भाडे आदी खर्च करावा लागतो. भाज्या पाण्यात धुऊन स्वच्छ करून त्याची वर्गवारी पाडून ते विकावे लागते. यामुळे खर्च वाढतो.

शेखर माळी

विक्रेता

---

२५ टक्के भाज्या निघतात खराब

आडतमध्ये सरसकट भाज्या खरेदी कराव्या लागतात. तिथे निवडून भाज्या खरेदीचा प्रकार नाही. यामुळे क्विंटलमागे २० ते २५ किलो भाज्या खराब निघतात, त्या फेकून द्याव्या लागतात. तसेच हलकी, मध्यम व उच्चप्रतीचे अशी प्रत करावी लागते. चांगल्या प्रतीची भाजीचे भाव जास्त असले तरी त्यातून खराब भाज्यांमुळे झालेली नुकसानभरपाई केली जाते. पण विक्रेत्यांना जास्त नफा मिळत नाही.

शेख खलील

विक्रेता

---

चौकट

अर्धा-पाव किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही -

आमचे छोटे कुटुंब आहे. दररोज अर्धा ते पाव किलो भाजी आम्हाला पुरेशी होते. त्यासाठी जाधववाडीत आडत बाजारात जाणे परवडत नाही. यामुळे जास्त पैसे गेेले तरी चालते पण घरासमोर भाजी मिळते.

संध्या कुलकर्णी

गृहिणी, हडको

--

दररोज आडत बाजारात जाऊन भाजी खरेदी करणे अशक्य आहे. सणासुदीच्या दिवसात जास्त भाजी लागते तेव्हा जाधववाडीत जाऊन आम्ही भाज्या खरेदी करतो. एरवी दररोज हातगाडीवर किंवा शिवाजीनगरमध्ये जाऊन भाजी खरेदी करते. महाग असली तरी नाईलाजाने खरेदी करावी लागते.

रेणुका रामदासी

गृहिणी, बीड बायपास रोड

Web Title: How much loot? In Jadhavmandi, guar costs Rs 30, while near home it costs Rs 50 per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.