हौसेला मोल नसते! छत्रपती संभाजीनगरात ७०० भावांना बांधली चांदीची; २०० जणांना सोन्याची राखी
By प्रशांत तेलवाडकर | Published: September 8, 2023 06:19 PM2023-09-08T18:19:51+5:302023-09-08T18:21:22+5:30
मागील वर्षापेक्षा २ टक्क्यांनी यंदा चांदी-सोन्याच्या राख्यांची विक्री वाढली.
छत्रपती संभाजीनगर : बहीण - भावातील अतूट स्नेहाचे प्रतीक असलेला ‘राखी पौर्णिमा’ सण काही दिवसापूर्वी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘ताई - दादा’मधील हा स्नेह पैशात मोजता येत नाही किंवा कोणी तसा प्रयत्नही करू नये. मात्र, जेव्हा सराफा बाजारात या सणानिमित्त किती सोन्याच्या व किती चांदीच्या राखी विक्री झाल्या, हे विचारले असता प्राथमिक अंदाजानुसार शहरात चांदीच्या ७०० आणि सोन्याच्या २०० राख्या विक्री झाल्या. तेवढ्याच पटीने भाऊरायाचीही ओवाळणीची जबाबदारी वाढली. तसेही हौसेला मोल नसते, असे म्हटले जाते, याची राखी पौर्णिमेच्या निमित्ताने नव्याने प्रचिती आली.
सोने - चांदीचे भाव
राखीपौर्णिमा
(३० ऑगस्ट)
सोने--- ६०,४५० रु. (१० ग्रॅम)
चांदी---७६,६०० रु. (प्रतिकिलो)
(६ सप्टेंबर)
सोने--- ६०,५०० (१० ग्रॅम)
चांदी्--- ७५,००० रु. (प्रतिकिलो)
चांदीची राखी ३५० रुपयांपासून
राखी पौर्णिमेला चांदीच्या राख्यांचे आकर्षण जास्त होते. शहरात चांदीच्या १,५०० राख्या विक्री झाल्या. यांची किंमत ३५० ते १,२०० रुपये प्रतिनग होती. यात १ ग्रॅम ते १० ग्रॅमपर्यंतच्या राख्यांचा समावेश होता.
सोन्याची राखी ४ हजारांपासून
चांदीच्या तुलनेत सोन्याची राखी खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी असली तरी शहरात सोन्याच्या २०० राख्या विक्री झाल्या आहेत. यात अर्धा ग्रॅम ते १० ग्रॅमपर्यंत वजनाच्या राख्या ४ हजार ते ७० हजार रुपयांपर्यंत विकल्या गेल्या.
राजकोटची चांदी, तर स्थानिक सोन्याच्या राख्या
राजकोट येथून बहुतांश चांदीच्या राख्या मागविण्यात आल्या होत्या. सोन्याच्या राख्या स्थानिक सुवर्णकारांनी तयार केल्या होत्या. चांदीच्या राख्यांमध्ये असंख्य प्रकार असल्याने या राख्यांना यंदा मागणी होती.
मागील वर्षीपेक्षा जास्त राख्यांची विक्री
दरवर्षी चांदी व सोन्याच्या राख्या खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. चांदी व सोन्याची राखी बांधून जास्त प्रेम व्यक्त केले जाते, असे नाही. पण, माझ्या भावाला मी चांदीची किंवा सोन्याची राखी बांधते तेवढा तो अनमोल आहे. अशी भावना बहिणींची यामागील होती. यामुळे मागील वर्षापेक्षा २ टक्क्यांनी यंदा चांदी-सोन्याच्या राख्यांची विक्री वाढली.
- राजेंद्र मंडलिक, अध्यक्ष, सराफा असोसिएशन
चांदीचे भाव १,१०० रुपयांनी घसरले
राखी पौर्णिमेनंतर मागील ७ दिवसात चांदीचे भाव किलोमागे १,१०० रुपयांनी उतरले. आज चांदी ७५,५०० रुपये किलोने विकत आहे. राखी पौर्णिमेला ७६,६०० रुपये भाव होता. सोन्याच्या भावात १०० रुपयांची चढ-उतार झाली.
-नंदकुमार जालनावाला, व्यापारी