जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान पाणी गळती किती होते, पालिका प्रशासकांनी मागवला अहवाल
By मुजीब देवणीकर | Published: September 24, 2022 01:11 PM2022-09-24T13:11:38+5:302022-09-24T13:12:28+5:30
जीर्ण पाणीपुरवठा यंत्रणेची प्रशासकांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना निर्देश
औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्यात अधूनमधून तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे. त्यामुळे शहराला प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी जीर्ण यंत्रणेची पाहणी केली. जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान पाणी गळती किती होते, याची माहिती सादर करा, जायकवाडीतील प्रत्येक पंपहाऊसवर इलेक्ट्रिशियनची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पाठवा, असे आदेश त्यांनी दिले.
डॉ. चौधरी यांनी उद्भव विहिरीची माहिती घेतली. जायकवाडी ते नक्षत्रवाडी यादरम्यान किती पाण्याची गळती होते? याचा अहवाल सादर करा, १२०० मिलिमीटर व्यासाच्या योजनेवर विद्युत यंत्रणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी एक सेवानिवृत्त व अनुभवी इलेक्ट्रिकल इंजिनिअरची नेमणूक व प्रत्येक पंप हाऊसवर एक इलेक्ट्रिशियनची नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश त्यांनी दिले. ढोरकीन, फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राची देखील त्यांनी पाहणी केली. यावेळी उपअभियंता मनोज बाविस्कर यांनी त्यांना माहिती दिली.
फारोळा येथील ५६ ‘एमएलडी’च्या जुन्या योजनेवर ४७५ अश्वशक्तीच्या तीन पंपांची रेट्रो फिटिंग करून त्यांची क्षमता ५४० एवढी वाढविण्याचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. यामुळे शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात चार ते पाच ‘एमएलडी’ची वाढ अपेक्षित आहे. ३० अश्वशक्तीचे दोन पंप बसविण्याचे काम सुरू आहे. यामुळे अतिरिक्त पाणी १०० ‘एमएलडी’च्या संपमध्ये टाकता येईल. यामुळे ढोरकीन व जायकवाडीचे पंप बंद करण्याची आवश्यकता राहणार नाही, अशी माहिती यावेळी प्रशासकांना अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी कार्यकारी अभियंता एम. बी. काझी, डी. के. पंडित, हेमंत कोल्हे, उपअभियंता किरण धांडे, उपअभियंता बी. डी. गायकवाड यांची उपस्थिती होती.