छत्रपती संभाजीनगरात फुटपाथच गेले चोरीला? रस्ते अपघातात दरवर्षी होतो २०० नागरिकांचा मृत्यू

By मुजीब देवणीकर | Published: December 12, 2023 04:58 PM2023-12-12T16:58:05+5:302023-12-12T16:59:29+5:30

सिडको-हडकोत अतिक्रमणे, जुन्या शहरात थांगपत्ताच नाही

How should pedestrians walk? The footpath was stolen in Chhatrapati Sambhajinagar? CIDCO-Hudco encroachments, disappear in old city | छत्रपती संभाजीनगरात फुटपाथच गेले चोरीला? रस्ते अपघातात दरवर्षी होतो २०० नागरिकांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरात फुटपाथच गेले चोरीला? रस्ते अपघातात दरवर्षी होतो २०० नागरिकांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील मुख्य रस्त्यांवर पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथ नाहीत. फुटपाथ चोरीला गेले की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. सिडको-हडको भागात सर्वच मुख्य रस्त्यांवर फुटपाथ खंडपीठाच्या आदेशामुळे शाबूत आहेत. मात्र, सायंकाळी तेथेही पथविक्रेत्यांचे अतिक्रमण असते. नागरिकांना प्रचंड त्रास होतो. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत रस्ते अपघातात शहरात १५४ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. दरवर्षी किमान २०० नागरिकांना जीव गमवावा लागतोय. त्यानंतरही महापालिकेकडे खास फुटपाथसाठी कोणतेही धोरण नाही, हे विशेष.

शहरात ११६० किमी लांबीचे रस्ते आहेत. जुन्या शहरात मुख्य डीपी रस्त्यांवर बहुतांश ठिकाणी फुटपाथसाठी जागाही सोडलेली दिसते. त्यावर एवढी अतिक्रमणे आहेत की, येथे कधी तरी फुटपाथ होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे. नगररचना विभागाने प्रत्येक रस्त्यावर टेप लावून मोजणी केली आणि मार्किंग केल्यावर फुटपाथ बाहेर येतील. महापालिकेत सत्ताधारी मतदार खराब होईल, म्हणून प्रशासनाला आजपर्यंत कारवाई करू देत नव्हते. आता चार वर्षांपासून महापालिकेत ‘कारभारी’ नाहीत. त्यानंतरही प्रशासन हिम्मत दाखवायला तयार नाही.

अतिक्रमण कारवाईचे नाट्य
सोमवारी सकाळीच महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुलमंडी भागातील कुंभारवाडा, रंगारगल्ली, सिटी चाैक ते गुलमंडी या रस्त्यावर दुकानांसमोरील किरकोळ अतिक्रमणे काढली. पण या कारवाईने पादचाऱ्यांना विशेष दिलासा मिळाला नाही.

सिडको-हडकोत वेगळाच त्रास
सिडको-हडको भागातील मुख्य रस्त्यांवर फुटपाथ सोडलेले आहेत. वर्षभरात महापालिकेने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढली. मात्र, सायंकाळी पथविक्रेते फुटपाथवर ठाण मांडून बसतात. त्यामुळे पादचाऱ्यांना नाइलाजास्तव मुख्य रस्त्यांवरून ये-जा करावी लागते.

पोलिसांची आकडेवारी थक्क करणारी
-जानेवारी ते सप्टेंबर २०२३ मध्ये अत्यंत घातक स्वरूपाच्या अपघातांमध्ये १४६ जण जखमी झाले.
-गंभीर स्वरूपाच्या अपघातांमध्ये १८९ जण जखमी झाले.
-किरकोळ स्वरूपाच्या अपघातात ६६ जणांना इजा झाली.
-१५४ जणांना विविध अपघातांमध्ये जीव गमवावा लागला.

फुटपाथ उंच असावेत
रस्त्याच्या कडेला फुटपाथ तयार केले आहेत. त्यामुळे अतिक्रमणे होतात. फुटपाथ जिथे एक ते दोन फुट उंचीवर आहेत, तेथे अतिक्रमणे होतच नाहीत. अलीकडे महापालिकेने फुटपाथवर निधी खर्च केला. जी.२० परिषद, मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी सांगता वर्षाच्या सभारंभात ही कामे केली. भविष्यासाठी १ हजार कोटींच्या रस्त्याचा प्रस्ताव तयार केला. त्यात फुटपाथ प्राधान्याने घेतले.
- ए.बी. देशमुख, अतिरिक्त शहर अभियंता, मनपा.

काळजी महापालिकेने घ्यावी
शहरातील प्रत्येक मुख्य रस्त्यावर फुटपाथ असायलाच हवे. त्यावर अतिक्रमणे होणार नाहीत, याची काळजी महापालिकेने घ्यायला हवी.
- रवी पंडित, नागरिक

पादचाऱ्यांचे अंगावर वाहने
फुटपाथ नसल्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्यांवरून ये-जा करावी लागते. अनेकदा वाहनचालक नियंत्रण सुटल्यावर पादचाऱ्यांचे अंगावर वाहने घालतात.
- मधुकर सोनवणे, नागरिक

Web Title: How should pedestrians walk? The footpath was stolen in Chhatrapati Sambhajinagar? CIDCO-Hudco encroachments, disappear in old city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.