वीज बिल कसे भरू? आधी मीटर बदलून द्या साहेब ! मीटर बदलून हवे असल्यास काय कराल?
By साहेबराव हिवराळे | Published: November 10, 2023 03:29 PM2023-11-10T15:29:21+5:302023-11-10T15:29:50+5:30
वाढीव बिल आले की, वाद निर्माण होऊन एक तर महावितरणला नुकसान, नाही तर वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो
छत्रपती संभाजीनगर : ग्राहकांच्या वीज वापराचे अचूक देयक, हे वीज ग्राहकांसोबतच महावितरणसाठीही लाभकारक आहे. त्यामुळेच अचूक बिलिंगला महावितरणकडून प्राथमिकता मिळते. नादुरुस्त मीटरमुळे ग्राहकांना मनस्ताप, तर महावितरणला नुकसान सहन करावे लागते. मीटर बंद, तुटलेला डिस्प्ले, नादुरुस्त मीटरमुळे वीज वापराची कमी-अधिक प्रमाणात नोंद या कारणांमुळे ग्राहकांचा अचूक वीज वापर नोंदविला जात नाही.
वाढीव बिल आले की, वाद निर्माण होऊन एक तर महावितरणला नुकसान, नाही तर वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच महावितरणने नियमित आणि अचूक बिलिंगला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सुधारणा केल्या आहेत.
मीटर खराब असल्याच्या महिनाभरात २५ ते ३० तक्रारी
जिल्ह्यात मीटर जळाल्याच्या व नादुरुस्त झाल्याच्या दरमहा सरासरी २५ ते ३० तक्रारी असतात. रोज प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन तक्रारी एक-दोन दिवसांत सोडवल्याचा महावितरण दावा करते.
मीटर बंद असल्याच्या तक्रारी
मीटर नादुरुस्त झाल्याबाबत ग्राहकांनी नोंदवलेल्या तक्रारींची पडताळणी करून तक्रारीत तथ्य आढळल्यास मीटर बदलून देण्यात येते. मंजूर भार कमी-जास्त करण्याच्या मागणीप्रमाणे आवश्यकतेनुसार मीटर बदलले जाते.
त्वरित मिळेना मीटर
दोन दिवसांत मीटर बदलून मिळते, असे सांगितले जाते. परंतु, कारवाई आणि कामकाजात होणारे अडसर पाहता बहुतांश वेळी मीटर बदलण्यासाठी विलंब होत आहे. त्वरित मीटर मिळत नसल्याची ओरड आहे.
मीटर मिळण्यात अडचणी काय?
मीटर बदलून हवे असल्यास काय कराल?
मोबाइल ॲपवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयात तक्रार नोंदवता येते. या तक्रारींची पडताळणी करून तातडीने मीटर बदलण्याचा दावा महावितरण करते.
अचूक वीजबिलामुळे ग्राहकांच्या तक्रारी व त्यातून निर्माण होणारा असंतोष; या दोन्ही बाबी टाळल्या जातात. ग्राहक समाधानी व महावितरणलाही वितरित केलेल्या विजेचा अचूक परतावा, यात मीटरवरील अचूक वीजमापन महत्त्वपूर्ण ठरते. नादुरुस्त अथवा बंद मीटरवर महावितरणचे लक्ष असतेच; शिवाय तक्रारी असल्यास संबंधित ग्राहकांनी तातडीने संपर्क साधावा.
- महावितरण अधिकारी