प्रश्न सोडवणार कसा? अहो सर, चुकीचा पेपर हाती; विद्यापीठाच्या परीक्षेत उडाला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:38 PM2022-12-27T12:38:29+5:302022-12-27T12:38:58+5:30
जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाचा पेपर
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांना हॉल तिकीट न मिळाल्याने गोंधळ उडाला होता. या परीक्षेत गोंधळ सुरूच असून, सोमवारी एका केंद्रावर विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर देण्यात आला, त्यामुळे गोंधळ उडाला. अखेर पेपर बदलून दिल्यानंतरच परीक्षा सुरळीतपणे पार पडली.
पदव्युत्तर (पीजी) परीक्षेमध्ये नागसेन वन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात सोमवारी सकाळी १० ते दुपारी १ यादरम्यान एम. ए. इंग्रजीचा जुन्या अभ्यासक्रमाचा पेपर होता; परंतु चुकीचा पेपर देण्याचा प्रकार झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. एमए इंग्रजीच्या प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सत्राचा पेपर होता. ‘लिटरेचर इन इंग्लिश’ हा पेपर होता. सकाळी साडेनऊ वाजता परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून परीक्षा केंद्रावर पेपर पाठवण्यात आला. विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात पेपर वितरित केल्यानंतर हा तर नव्या अभ्यासक्रमाचा पेपर आल्याची विद्यार्थ्यांनी तक्रार केली. त्यानंतर केंद्रप्रमुखांनी परीक्षा विभागाला कळवले. त्यांनतर लगेच दुसरा, म्हणजेच जुन्या अभ्यासक्रमाचा पेपर उपलब्ध करून देण्यात आला. ८० गुणांची हा पेपर होता. जवळपास २०२ विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.
तत्काळ दुसरा पेपर
संबंधित परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर तत्काळ दुसरा पेपर बदलून देण्यात आल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. गणेश मंझा यांनी सांगितले.