व्हर्चुअल मैत्री किती खरी ? परदेशी मैत्रिणीशी फेसबुकवरील मैत्री पडली ३ लाखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 07:06 PM2021-12-06T19:06:19+5:302021-12-06T19:11:00+5:30
cyber crime in Aurangabad : ३० हजार पौंडांच्या आशेने खाजगी कंपनीतील नोकरदाराने ३ लाख गमावले
औरंगाबाद : फेसबुकवर बनावट अकाउंटवर ( Fake Facebook Account ) एका परदेशी महिलेने औरंगाबादच्या गृहस्थाला ३ लाखांना चुना लावला.फेसबुकवर मैत्रीतून दोघात वारंवार मेसेंजरवर संदेशांची देवाणघेवाण झाली. एका दिवशी मोबाइल नंबर मागितला. औरंगाबादेतील मित्राने तात्काळ दिला. काही दिवसांनी परदेशातून गिफ्ट पाठविल्याचे तिने सांगितले. ते गिफ्ट सोडवून घेण्यासाठी तब्बल २ लाख ९९ हजार रुपयांना गंडा घातला; पण गिफ्टच मिळाले नाही. त्यामुळे गृहस्थाने सायबर ( Cyber Crime in Aurangabad ) पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सातारा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार खाजगी कंपनीतील नोकरदार सतीश तिवारी (वय ५५, रा. प्लॉट नं. ७, रेवती हाऊसिंग सोसायटी, ईटखेडा) यांना लिझी मॉर्गन (रा. ब्रिटन) या महिलेची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये अनेक वेळा बोलणे झाले. या बोलण्यानंतर मॉर्गनने तिवारी यांना मोबाइल नंबर मागितला. त्यांनी दिला. ते व्हॉटस्ॲपवर संपर्क ठेवू लागले. एका दिवशी तिवारी यांच्यासाठी गिफ्ट पाठविल्याचे तिने सांगितले. त्याच्या पावतीचा फोटोही टाकला. यानंतर दोन दिवसांनी एका क्रमांकावरून तिवारी यांना फोन आला. त्यात तिने निशा कुमारी असे नाव सांगितले. लिझी मॉर्गन नावाच्या महिलेने तुमच्या नावावर पार्सल पाठविल्याचे सांगितले. ते पार्सल कस्टम क्लिअरन्सकरिता अडकून पडले आहे. ते क्लिअर करण्यासाठी १८७०० रुपये भरावे लागतील. त्यासाठी एक खाते क्रमांक देण्यात आला. त्यात खात्यात तिवारींनी पैसे भरले.
दुसऱ्या दिवशी निशाचा परत फोन आला. तिने तुमच्या पार्सलमध्ये ३० हजार पौंड रोख रक्कम मिळाल्याचे सांगितले. ते बेकायदेशीर कृत्य आहे. त्याचा दंड तुम्हाला भरावा लागेल. अन्यथा कारवाई होईल, असे सांगितले. त्यानुसार ५७८०० रुपये दंडाची रक्कम दुसऱ्या एका बँक खात्यात भरली. त्यानंतर तुमचे परदेशी चलन भारतीय चलनात बदलण्याकरिता १ लाख १० हजार रुपये भरावे लागतील. अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगण्यात आले. या मागणीनुसार पैसे भरले. दोन दिवसांनी पार्सलमधील पैसे भारतीय चलनात रूपांतरित झाले आहेत. एवढी मोठी रक्कम असल्यामुळे त्यावर भारतीय नियमाप्रमाणे ९७ हजार रुपये आयकर भरावा लागेल, असे सांगण्यात आले. त्यातील ६० हजार रुपये लिझी मॉर्गनने भरले आहेत. उरलेले ३७ हजार रुपये तुम्हाला भरावे लागतील, असे सांगण्यात आले. तिवारी यांनी तेही भरले.
तिसऱ्या दिवशी निशाने पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी लागणाऱ्या फॉरेन कोडकरिता ७६२०० रुपये भरण्यास सांगितले. तिवारी यांनी हे पैसेही दोन बँक खात्यांत भरले. त्यानंतरही पैसे आले नाहीत. काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिवारींनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांनी पत्र देऊन सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यास सांगितले. यानुसार लिझी मॉर्गन व निशा कुमारी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
तीन बँक खात्यांचा वापर
तिवारी यांना फसविण्यासाठी सायबर भामट्यांनी तीन बँक खात्यांचा वापर केला. सुरुवातीला एचडीएफसी बँकेचा खाते क्रमांक दिला. त्यानंतर यस बँक आणि कर्नाटक बँकेचा खाते क्रमांक दिला. या खात्यावर तिवारी यांनी २ लाख ९९ हजार ७०० रुपये ट्रान्स्फर केले.