कसे होणार ‘दूध का दूध, पानी का पानी’; सॅम्पल कोण तपासणार?
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 27, 2024 07:09 PM2024-06-27T19:09:34+5:302024-06-27T19:09:47+5:30
छत्रपती संभाजीनगर शहरात अडीच लाख लिटर पॅकेट बंद दूध येते, तर दीड लाख लिटर दूध सुट्टे येते.
छत्रपती संभाजीनगर : शहरात दररोज चार लाख लुटर दूध विक्री होते. यात परजिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात पॅकबंद व सुट्टे दूध येते. मात्र, त्यात भेसळयुक्त दूध किती असते याची तपासणीच होत नाही. दुधाऐवजी दुग्धजन्य पदार्थांचे नमुने घेतले जातात. त्याचा तपासणी अहवालही ५ ते ६ महिन्यांनंतर येतो. मग ''दूध का दूध व पानी का पानी'' कसे ओळखता येणार.
शहरात रोज चार लाख लिटर दूध विक्री
छत्रपती संभाजीनगर शहरात अडीच लाख लिटर पॅकेट बंद दूध येते, तर दीड लाख लिटर दूध सुट्टे येते.
दोन महिन्यांत दुधाचा केवळ एक सॅम्पल
अन्न व औषधी प्रशासनातर्फे दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. मात्र, मागील दोन महिन्यांत विभागाने शहरातील एका ठिकाणचा दुधाचा नुमना घेतला. दुधजन्य पदार्थांचे २० नमुने घेण्यात आले.
सॅम्पल कमी अन् रिपोर्टचीही नाही हमी
मागील दोन महिन्यांत केवळ एकच ठिकाणच्या दुधाचा नमुना प्रशासनाने घेतला. तो प्रयोगशाळेत पाठविला, दोन महिने झाले, पण अजूनही तपासणी अहवाल प्राप्त झाला नाही. हे धक्कादायकच आहे. राज्यातील ठिकठिकाणच्या प्रयोगशाळेत काय काम केले जाते, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्राहकही करत नाही तक्रार
दूध जास्त पातळ आले की ग्राहक दूध विक्रेत्याकडे तक्रार करतात. दुधाची गुणवत्ता सुधारली नाहीतर दूध विक्रेता बदलून टाकतात. पण, कोणी दुधातील भेसळसंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करत नाही. बहुतांश ग्राहकांना दुधात केलेली भेसळ लक्षातच येत नाही. यामुळे कोणी प्रशासनाकडे तक्रार करत नाही. मागील दोन महिन्यांत ग्राहकांकडून एकही तक्रार आली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.