काम होणार तरी कसे?; औरंगाबाद महानगरपालिकेचे साडेतीन वर्षांत सात आयुक्त बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 07:16 PM2018-07-27T19:16:02+5:302018-07-27T19:17:32+5:30
सात आयुक्त बदलून गेले, मात्र शहरातील कचऱ्याच्या समस्येवर कुणालाही कायमस्वरूपी तोडगा काढता आला नाही.
औरंगाबाद : महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात सर्वाधिक आयुक्त मागील साडेतीन वर्षांत बदलून गेले. सात आयुक्त बदलून गेले, मात्र शहरातील कचऱ्याच्या समस्येवर कुणालाही कायमस्वरूपी तोडगा काढता आला नाही.
शहराला कचऱ्यात लोटण्यास कोण दोषी आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्तीच्या अभावी शहरातील कचरा समस्या सुटू शकलेली नाही, असे म्हणावे लागेल. तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांच्या काळात कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला. पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या राजकारणात त्यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यानंतर सुनील केंद्रेकर यांच्याकडे प्र्रभारी पदभार देण्यात आला. केंद्रेकर यांच्या बदलीनंतर ओम प्रकाश बकोरिया यांची मनपा आयुक्तपदी बदली करण्यात आली. पालिकेतील राजकीय गदारोळात त्यांचीही बदली झाल्यामुळे कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी त्यांनाही खूप काही करता आले नाही. त्यांची बदली झाल्यानंतर डी. एम. मुगळीकर यांच्याकडे मनपा आयुक्तपदाची जबाबदारी आली. त्यांना एक वर्षाचा कालावधी मिळाला. त्या काळात नारेगाव-मांडकी येथील दोन वेळा आंदोलने झाली.
दुसऱ्यांदा १६ फेबु्रवारी २०१८ पासून आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांची एका महिन्यातच बदली झाली. त्यांची बदली झाल्यानंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे मनपा आयुक्तपदाचा पदभार आला. राम यांनी कचरा समस्या सोडविण्यासाठी भरपूर ठिकाणी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. सेंट्रल नाका येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु त्यांचीही पुण्याला बदली झाली. राम यांची बदली झाल्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे महिनाभरासाठी मनपा आयुक्तपदाचा पदभार आला. त्यांनी पालिकेच्या कचरा समस्येत काहीही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला नाही. दरम्यान रुजू व्हावे की न व्हावे, या विवंचनेत अडकलेले डॉ.निपुण विनायक यांनी पालिका आयुक्तपदाचा पदभार घेतला. त्यांच्या कार्यकाळात कचऱ्याची समस्या सुटावी ही शहरवासीयांची अपेक्षा आहे.
राजकीय इच्छाशक्तीचे बळी
आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर अविश्वास आणल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली. तर ओम प्रकाश बकोरिया यांच्याबाबतीतही राजकीय दबावतंत्र वापरून बदली केली गेली. आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना कचऱ्याचे प्रकरण भोवले. त्यामुळे त्यांची बदली झाली.
साडेतीन ते चार वर्षांत सात मनपा आयुक्तांपैकी तीन प्रभारी आणि चार नियमित बदली होऊन येतात आणि जातात. परंतु शहराच्या समस्या तशाच आहेत. प्रशासन आॅक्सिजनवर असल्याप्रमाणे काम करीत असल्यामुळे ‘शहराचा कचरा’ झाला आहे.