वर्षभर कसे पुरेल पाणी? पावसाळा संपता संपताच मराठवाड्यात जलसाठा तळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 11:54 AM2023-10-11T11:54:44+5:302023-10-11T11:55:53+5:30
दुष्काळाचे घोंगावते संकट, सर्वाधिक पाणीपुरवठा योजना लघु आणि मध्यम प्रकल्पांवर अवलंबून
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या जेमतेम ८५ टक्के पाऊस पडला. त्यातही नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यावर अधिक आभाळमाया राहिल्याने अन्य सहा जिल्ह्यांवर जलसंकट घोंगावते आहे. या जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पात आजघडीला केवळ ३१ टक्केच जलसाठा उरला आहे.
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील लहान, मोठे आणि मध्यम धरणांतील जलसाठा ३१ ते ५० टक्के दरम्यान आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पात केवळ २६ टक्के जलसाठा आहे. जालना जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात २२ टक्के, बीड जिल्ह्यातील १६ मध्यम धरणात ४२ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पात २८ टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पात १६ टक्के, तर नांदेड जिल्ह्यातील ९ प्रकल्पांत ६१ टक्के आणि परभणी जिल्ह्यातील २ प्रकल्पात २५ टक्के जलसाठा आहे. याचप्रमाणे मराठवाड्यातील ७५० लघु प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थितीही चिंताजनक आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९८ लघु प्रकल्प असून, यामध्ये २८ टक्के, जालन्यातील ५७ प्रकल्पात ६ टक्के, बीडमधील १२६ लघु प्रकल्पात केवळ २३ टक्के, लातूर १३४ लघु पाटबंधारे धरणात २८ टक्के, धाराशिव जिल्ह्यातील २०४ लघु प्रकल्पात १७ टक्के जलसाठा आहे. नांदेड ८०, तर परभणी जिल्ह्यातील २२ प्रकल्पात अनुक्रमे ९८ टक्के व १४ टक्के पाणीसाठा आहे. हिंगोली जिल्ह्यातील २७ प्रकल्पांत आज ८६ टक्के जलसाठा असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून मिळाली.
सर्वाधिक पाणीपुरवठा योजना लघु आणि मध्यम प्रकल्पांवर अवलंबून
मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पात आज केवळ १७ टक्के जलसाठा उरला आहे. पावसाळा संपत असतानाच ही स्थिती असल्याने आगामी काळात धाराशिव जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
१५ ऑक्टोबरला निर्णय अपेक्षित
मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पात आज केवळ ४८ टक्के जलसाठा आहे. समन्यायी पाणीवाटप निकषांनुसार दरवर्षी १५ ऑक्टोबरला जायकवाडी प्रकल्पात किमान ६५ टक्के पाणीसाठा असावा. जायकवाडीच्या उर्ध्व भागातील धरणांमध्ये आज ९० ते ९५ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. त्यामुळे या प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी कडाच्या अधिकाऱ्यांनी आकडेमोड सुरू केली आहे.