‘घाटी’ चिठ्ठीमुक्त होणार कसे? तब्बल १९३ औषधींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:02 AM2021-08-20T04:02:02+5:302021-08-20T04:02:02+5:30

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला गेल्या तीन महिन्यांपासून हाफकिनकडून साडेसात कोटी रुपयांची तब्बल १९३ औषधी, वैद्यकीय साहित्य मिळण्याची नुसती प्रतीक्षाच ...

How will ‘Valley’ be letter free? Waiting for 193 medicines | ‘घाटी’ चिठ्ठीमुक्त होणार कसे? तब्बल १९३ औषधींची प्रतीक्षा

‘घाटी’ चिठ्ठीमुक्त होणार कसे? तब्बल १९३ औषधींची प्रतीक्षा

googlenewsNext

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला गेल्या तीन महिन्यांपासून हाफकिनकडून साडेसात कोटी रुपयांची तब्बल १९३ औषधी, वैद्यकीय साहित्य मिळण्याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. स्थानिक पातळीवर खरेदी करूनही रुग्णांच्या नातेवाइकांच्या हातात औषधी चिठ्ठ्या देणे सुरूच असल्याचे गुरुवारी घाटीत ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळले. औषधांचा पुरवठाच होत नसेल तर घाटी रुग्णालय चिठ्ठीमुक्त कसे होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

गोरगरिबांचा आधारवड म्हणून घाटी रुग्णालयाला ओळखले जाते. केवळ मराठवाडाच नव्हे, तर विदर्भ, खान्देशातील अनेक जिल्ह्यांतील हजारो रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. मात्र, मागील एक महिन्यापासून घाटी रुग्णालयामध्ये नॉनकोविड रुग्णांसाठी लागणारा औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना हाफकिन इन्स्टिट्यूटकडून औषधी तसेच वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा केला जातो. मात्र, हा पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याचे मागच्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (घाटी) आवश्यक असणारी औषधी व इतर वैद्यकीय साहित्य मिळण्यासाठीचा प्रस्ताव ४ मे २०२१ रोजी हाफकिन इन्स्टिट्यूटकडे पाठविला. मात्र, अद्यापही घाटीला औषधी व इतर वैद्यकीय साहित्य उपलब्ध झालेले नाही.

घाटी रुग्णालयात स्थानिक पातळीवर ३४ लाख रुपयांची अत्यावश्यक औषधींची खरेदी करण्यात आली आहे. हा औषधीसाठा आगामी २० दिवस पुरेल इतका आहे, तर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून ३ हजार ७५० सलाइन मिळाले आहेत; पण त्यानंतरही रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधी आणण्यास सांगणे सुरूच आहे. घाटी रुग्णालयातील परिस्थितीवर लोकप्रतिनिधींनी मार्ग काढून तुटवडा दूर करण्याची गरज असल्याची भावाना रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करीत आहेत.

चौकट...

प्रसूतीसाठी हजार रुपयांची औषधी

घाटीत प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एक महिलेचे नातेवाईक घाटी परिसरातील औषधी दुकानात गेले. इंजेक्शनपासून औषधी, साहित्य असे एक हजार रुपयांची औषधी त्यांना विकत घ्यावी लागली. चिठ्ठी लिहून दिल्याने ती आणण्यासाठी औषधी दुकानावर आल्याचे नातेवाइकाने सांगितले.

औषधींची मागणी

हाफकिनकडे ७.५० कोटींची १९३ औषधींची मागणी करण्यात आली आहे. औषधींची प्रतीक्षा केली जात आहे. स्थानिक पातळीवर खरेदी केलेली औषधी आगामी २० दिवस पुरेल, असे अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी सांगितले.

Web Title: How will ‘Valley’ be letter free? Waiting for 193 medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.