अजून सरकारचेच ठरेना मात्र मंत्रिमंडळात स्थान पटकवण्यासाठी इच्छुक मुंबईला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 02:19 PM2019-11-02T14:19:42+5:302019-11-02T14:23:13+5:30
सरकार महायुतीचेच स्थापन होईल, या आशेपोटी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
औरंगाबाद : राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी २४ आॅक्टोबर रोजी निकाल लागल्यानंतर सत्ता महायुतीचीच स्थापन होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असले, तरी महायुतीचे अजून काही ठरलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातून निवडून आलेल्या महायुतीच्या शिलेदारांपैकी कुणाचा क्रमांक मंत्रीमंडळात लागणार याबाबत, सध्या तरी राजकीय वर्तुळात फक्त चर्चाच सुरू आहेत.
शिवसेनेच्या वाट्याला मंत्रीपद आले तर ते सहापैकी कुणाला देणार आणि भाजपच्या वाट्याला मंत्रिपद आले तर तिघांपैकी कुणाला देणार, यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. सरकार महायुतीचेच स्थापन होईल, या आशेपोटी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही पक्षातील सर्व इच्छुक मुंबईला रवाना झाले आहेत.
सिल्लोडमधून आ. अब्दुल सत्तार यांनी विजय मिळविल्यामुळे पहिल्यांदाच तेथे सेनेचा विजय झाला आहे. शिवाय सेना सत्तार यांच्याकडे भविष्यातील साबीर शेख म्हणत पाहत असेल तर त्यांच्या नावाचा विचार करू शकते. पैठणचे आ. संदीपान भुमरे हे शिवसेनेत सध्या सर्वांत ज्येष्ठ आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा विचार पक्षाने केला नाही तर ते व त्यांचे समर्थक नाराज होतील. कन्नड आणि वैजापूरचे आमदार पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी काहीही संधी मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. औरंगाबाद मध्यचे आ. प्रदीप जैस्वाल यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून हॅट्ट्रिक करणारे आ. संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषदेवर निवडून गेलेले आ. अंबादास दानवे यांचाही शिवसेनेकडून विचार होणे शक्य आहे; परंतु दानवे यांचीही या पदावर निवडून जाण्याची पहिलीच वेळ आहे; परंतु पक्षीय पातळीवर अनेक बाबींचा विचार केल्यानंतर मंत्रिमंडळातील समावेशाबाबत निर्णय होईल.
भाजपकडून कुणाला संधी
भाजपच्या वाट्याला आलेल्या तीन मतदारसंघांपैकी औरंगाबाद पूर्वमधून आ. अतुल सावे हे मागच्या वेळी उद्योग राज्यमंत्री होते. नवीन सरकार स्थापनेत त्यांना बढती मिळते की, तेच खाते त्यांच्याकडे कायम राहते याबाबत अजून काही स्पष्टता नाही. विधानसभा अध्यक्षपदी फुलंब्रीतून निवडून आलेले आ. हरिभाऊ बागडे हेच कायम राहतील, असे बोलले जात आहे. गंगापूरमधून आ. प्रशांत बंब यांनीही हॅट्ट्रिक केली आहे. यावेळी भाजप श्रेष्ठी त्यांचा विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान शिवसेनेचे जैस्वाल यांचा बायोडाटा शिवसेना भवन येथून मागविण्यात आला आहे, जैस्वाल सध्या मुंबईत आहेत. तर आ.भूमरे यांना देखील मंत्रिमंडळात समावेश होण्याची अपेक्षा आहे. आ.शिरसाट यांनी आपल्या परीने पक्षातील काही नेत्यांशी संपर्क ठेवला आहे. परंतु इच्छुकांच्या इच्छा तेव्हाच पुर्ण होतील, जेव्हा महायुतीचे सरकार होण्यासाठी वाटाघाटी होतील.
तीन सूत्रांचा विचार होणे शक्य
पक्षातील ज्येष्ठतेनुसार भाजपमधून बागडे आणि सेनेचे भुमरे यांची नावे आहेत. हॅट्ट्रिक करण्यात आ. बंब आणि आ. शिरसाट यांची नावे आहेत. सोशल इंजिनिअरिंगचा विचार केला, तर आ. सत्तार यांचे नावे पुढे येते. ज्येष्ठता, हॅट्ट्रिक, सोशल इंजिनिअरिंगच्या या सूत्रानुसार सरकार स्थापनेनंतर जिल्ह्यात एखादे कॅबिनेट आणि एखादे राज्यमंत्री पद मिळेल, अशी चर्चा आहे.