राजस्थानमध्ये करमतंय का? राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले,' तिकडे कामाला गेलोय...'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 03:26 PM2024-09-30T15:26:41+5:302024-09-30T15:29:14+5:30
राजस्थानमध्ये शैक्षणिक सुधारणांसाठी काम सुरू केल्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले
छत्रपती संभाजीनगर : मी विधानसभा निवडणूक लढविणार नाही, हे दीड वर्षापूर्वीच जाहीर करून टाकले होते. ८० वर्षांचा झाल्यामुळे शरीराला व्याधी लागतील, त्यामुळे अलिप्त राहण्याचा विचार केला होता. त्यात अचानक राजस्थान राज्यपालपदाची संधी मिळाली. आता इकडील लोक विचारत आहेत, नाना तुम्हाला राजस्थानमध्ये करमतंय का? लोकांना सांगतो, तिकडे कामाला गेलोय करमायला नाही, असे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी रविवारी आयोजित सत्काराला उत्तर देताना स्पष्ट केले.
निमित्त होते, देवगिरी बँकेने आयोजित केलेल्या सत्कार समारंभाचे. मंचावर बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उद्योजक राम भाेगले, वामन देशपांडे, माजी आमदार नितीन पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी राज्यपाल बागडे म्हणाले, राजस्थानमधील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन, सरकारी वेतन घेणारी महाविद्यालयांना नॅक अंतर्गत मान्यता प्राप्त करण्याचे आदेश दिले. जर नॅक मान्यताप्राप्त महाविद्यालये झाली नाही तर कारवाई केली जाईल. त्या राज्यात आदिवासी लोकसंख्या जास्त आहे. ९ जिल्ह्यातील ५० टक्के जनजाती आहेत. केंद्र शासनाच्या योजना तिथपर्यंत जातात की नाही, यासाठी विचारणा केली. घरकुल, पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. बाडमेर जिल्ह्यात उष्णता अधिक असते. ५२ डिग्री अंश सेल्सिअस तापमानामध्ये भारतीय सैन्य पाकलगतच्या सीमेवर तैनात असते. तांबोड या गावात जाऊन पाहणी केली. तेथे नर्मदा सरोवरमधील पाणी ८०० कि.मी. लांबून पाेहोचविले आहे. शितोळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उद्याेजक भोगले, देशपांडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
मला २०२४ ची निवडणूक लढवा म्हणत होते...
मला नागरिक २०२४ ची निवडणूक शेवटची म्हणून लढवा, असे म्हणत होते; परंतु मी वाढत्या वयामुळे नकार दिला. कुणाला उमेदवारी द्यावी, हे भाजपमध्ये सांगता येत नाही. आजवर आम्ही देखील तिकिटासाठी कुणाची शिफारस केलेली नाही, असे राज्यपाल बागडे यांनी स्पष्ट केले.