एचआरसीटी स्कोअर तब्बल २१, पण ७८ वर्षीय आजोबा झाले ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:04 AM2021-05-09T04:04:07+5:302021-05-09T04:04:07+5:30

औरंगाबाद : ‘एचआरसीटी’ स्कोअर तब्बल २१...ऑक्सिजन पातळी ७५ आणि रुग्ण व्हेंटिलेटर...तेही तब्बल १३ दिवस...हे वाचून अनेकांच्या तोंडातून अरे देवा...असाच ...

HRCT score was 21, but the 78-year-old grandfather was cool | एचआरसीटी स्कोअर तब्बल २१, पण ७८ वर्षीय आजोबा झाले ठणठणीत

एचआरसीटी स्कोअर तब्बल २१, पण ७८ वर्षीय आजोबा झाले ठणठणीत

googlenewsNext

औरंगाबाद : ‘एचआरसीटी’ स्कोअर तब्बल २१...ऑक्सिजन पातळी ७५ आणि रुग्ण व्हेंटिलेटर...तेही तब्बल १३ दिवस...हे वाचून अनेकांच्या तोंडातून अरे देवा...असाच शब्द बाहेर पडेल. एचआरसीटी स्कोअर ९ च्या पुढे गेला की एकच चिंता व्यक्त होते. पण डाॅक्टर, परिचारिकांचे प्रयत्न, योग्य उपचार आणि रुग्णाची सकात्मकता, या सगळ्यामुळे एचआरसीटी स्कोअर २१ आणि १३ दिवस व्हेंटिलेटरवर असलेले ७८ वर्षीय आजोबा जिल्हा सामान्य रुग्णालयातून शुक्रवारी ठणठणीत होऊन घरी परतले.

सुभाष जाधव (रा. गंगापूर) असे ७८ व्या वर्षी कोरोनावर विजय मिळविणाऱ्या आजाेबांचे नाव आहे. गंगापूर येथून त्यांना २० एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल होताना त्याचा एचआरसीटी स्कोअर २१ होता, ऑक्सिजन पातळी तर ७५ पर्यंत घसरलेली होती. त्यामुळे प्रकृती गंभीर होती. रुग्णाच्या उपचाराचे आव्हान जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांनी स्वीकारले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने दाखल होताच रुग्णाला व्हेंटिलेटर लावावे लागले. उपचार सुरू केल्यानंतर व्हेंटिलेटरवरच रुग्णाचा एक दिवस पुढे जात होता. ३ मे पर्यंत म्हणजे तब्बल १३ दिवस व्हेंटिलेटर राहिला. उपचाराला प्रतिसाद मिळाला आणि रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. कोरोनाची लागण होण्यापूर्वी रुग्णाने लसीचा पहिला डोस घेतलेला होता. त्याचाही फायदा झाला. ३ मे रोजी रुग्णाचा व्हेंटिलेटर निघाला. त्यानंतर जनरल वाॅर्डात उपचार करण्यात आले. अखेर आजोबा ठणठणीत झाल्याने ७ मे रोजी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.एस.व्ही. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कमलाकर मुदखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. कीर्ती तांदळे, डाॅ. अश्विन पाटील, आयसीयू इन्जार्ज सिस्टर जयश्री कुलकर्णी, रिता खलंग्रीकर, आशा शिरसाट, अनुजा सावरगावे, स्वाती कराळे, सीमा देशमुख, आशा क्षीरसागर,राजश्री सत्रे, फिजिओथेरपिस्ट प्राची काटे, एक्सरे टेक्निशियन अनिल वाहूळ, जीवन वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

रुग्णाची सकारात्मकता महत्त्वाची

सध्या कोरोना झाला की एचआरसीटी स्कोअरची चिंता केली जाते. पण स्कोअरची चिंता करण्यापेक्षा वेळीच उपचार घेतला पाहिजे. आजार अंगावर काढला तरच स्कोअर वाढतो. हा स्कोअर वाढला तरी योग्य उपचाराने रुग्ण बरा होतो. पण उपचाराबरोबर रुग्णाची सकारात्मकताही महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. जिल्हा रुग्णालयात मिळालेल्या उपचारामुळेच आपण सुखरूप घरी जात असल्याचे सुभाष जाधव म्हणाले.

फोटो ओळ....

जिल्हा रुग्णालयात ७८ वर्षीय आजोबांना सुटी देताना उपस्थित डाॅक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी.

Web Title: HRCT score was 21, but the 78-year-old grandfather was cool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.