हृषिकेश मोटकरच्या शतकी खेळीने महाराष्ट्राची गोवा संघाविरुद्ध स्थिती भक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:05 AM2017-12-11T01:05:50+5:302017-12-11T01:06:03+5:30
पुणे येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत हृषिकेश मोटकरच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने पहिल्या डावात १०७ धावांची आघाडी घेत आपली स्थिती भक्कम केली आहे.
कुचबिहार करंडक : पहिल्या डावात १०७ धावांची आघाडी
औरंगाबाद : पुणे येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत हृषिकेश मोटकरच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने पहिल्या डावात १०७ धावांची आघाडी घेत आपली स्थिती भक्कम केली आहे. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर गोवा संघाने दुसºया डावात ५ बाद १६१ धावा केल्या आहेत. दिवसअखेर दिगेश रायकर १५ व सईश कामत २३ धावांवर खेळत आहेत. त्यांच्याकडून आलम खानने सर्वाधिक ९६ चेंडूंत ४ चौकार, २ षटकारांसह ३७, मंथन कुथकरने ३२, यश परबने २२ व राहुल मेहताने २५ धावा केल्या. महाराष्ट्राकडून सिद्धेश वरघंटे आणि यतीन मंगवाणी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
त्याआधी कालच्या ५ बाद २४८ या धावसंख्येवरून पुढे खेळताना महाराष्ट्राने सर्वबाद ३२२ धावा केल्या. महाराष्ट्राकडून हृषिकेश मोटकर याने २५१ चेंडूंत १६ चौकारांसह १२७ धावांची भागीदारी केली. हृषिकेश मोटकर याने स्वप्नील फुलपगर याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी ८० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. स्वप्नील फुलपगरने ५५ चेंडूंत ८ चौकारांसह ४७, सिद्धेश वरघंटे याने ३३ धावांचे योगदान दिले. गोवा संघाकडून हेरंब परबने ७५ धावांत ३ गडी बाद केले. ऋत्विक नाईक व बलप्रीतसिंग यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. गोवा संघाने पहिल्या डावात २१५ धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : गोवा (पहिला डाव) : २१५. दुसरा डाव : ६७ षटकांत ५ बाद १६१. (आलम खान ३७, मंथन कुथकर ३२. सिद्धेश वरघंटे २/४९, यतीन मंगवाणी २/२४).
महाराष्ट्र : पहिला डाव : ८८ षटकांत सर्वबाद ३२२. (हृषिकेश मोटकर १२७, स्वप्नील फुलपगर ४७. हेरंब परब ३/७५).