बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘शॉक ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:22 AM2019-02-21T00:22:59+5:302019-02-21T00:23:32+5:30
महावितरणच्या गलथान कारभारामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या तोंडावर बुधवारी रात्री शॉक बसला. सातारा-देवळाईसह परिसरातील विविध भागांतील वीजपुरवठा रात्री ९ वाजेच्या सुमारास खंडित झाला. परिणामी हा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. रात्री बारावाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
औरंगाबाद : महावितरणच्या गलथान कारभारामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या तोंडावर बुधवारी रात्री शॉक बसला. सातारा-देवळाईसह परिसरातील विविध भागांतील वीजपुरवठा रात्री ९ वाजेच्या सुमारास खंडित झाला. परिणामी हा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. रात्री बारावाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
बारावीच्या परीक्षांना गुरुवारपासून (२१) सुरुवात होत आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर आहे. इंग्रजी विषयाविषयी आधीच भीती बाळगली जाते. त्यामुळे पेपरच्या काही तास अगोदर मिळणाऱ्या वेळेत विद्यार्थी अभ्यासाला प्राधान्य देतात. पहिल्या पेपरला सामोरे जाण्यापूर्वीच वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना अडचणीला सामोरे जाण्याचा प्रकार बुधवारी रात्री झाला. सातारा-देवळाई परिसरातील वीज रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक ‘गुल’ झाली. काही मिनिटांत लाईट परत येईल, या आशेने नागरिकांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले; परंतु अर्धा तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. एमआयटी परिसरापासून देवळाईपर्यंतचा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. शिवाजीनगर परिसरातील वीजपुरवठा बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली. या प्रकारामुळे बारावीचे विद्यार्थी असलेल्या घरातील पालकांची चिंता वाढली. बराच वेळ प्रतीक्षा करूनही पुरवठा सुरळीत होत नसल्याचे लक्षात येताच नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला. सातारा परिसरात बिघाड झाला असून वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागेल, काम सुरूआहे, अशी उत्तरे देण्यात येत होती. त्यामुळे महावितरणच्या कारभाराविषयी नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
मोबाईल, चार्जेबल लाईटच्या उजेडात अभ्यास
बारावीची परीक्षा सुरू होणार असतानाच महावितरणने वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाला.
३३ के. व्ही. लाईनमध्ये बिघाड
सातारा परिसरात ३३ के. व्ही. लाईनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे सातारा-देवळाईतील वीजपुरवठा खंडित झाला. दुरुस्तीचे काम सुरूआहे, अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांनी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास दिली. आणखी एक तास दुरुस्तीला लागेल, असेही सांगण्यात आले.