तक्रारी आलेल्या परीक्षा केंद्रांचा स्टाफ बदलला; नवीन अधिकाऱ्यांना पालकांकडून धमक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:36 IST2025-03-01T11:35:54+5:302025-03-01T11:36:28+5:30
HSC/SSC Exam:पोलिस संरक्षण घेण्याची वेळ, शिक्षणाधिकाऱ्यांची धक्कादायक माहिती

तक्रारी आलेल्या परीक्षा केंद्रांचा स्टाफ बदलला; नवीन अधिकाऱ्यांना पालकांकडून धमक्या
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवरील काही तक्रारी आल्यानंतर त्या ठिकाणचा स्टाफ बदलण्यात आला आहे. त्यानंतर नेमलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षकांना संबंधित केंद्राच्या परिसरातील नागरिक, पालकांकडून धमक्या देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.
जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त घेण्यासाठी शिक्षण विभागासह महसूल विभाग प्रयत्न करीत आहे. त्यानुसार भरारी पथकांनी भेट दिलेल्या ठिकाणी गडबड असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित ठिकाणचा संपूर्ण स्टाफ बदलला आहे. नवीन दिलेला स्टाफ कोणत्याही प्रकारची कॉपी होऊ न देता परीक्षा सुरळीत घेत असल्यामुळे काही केंद्रांवर संचालक, पर्यवेक्षकांना धमकावण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पैठण तालुक्यातील श्रीराम माध्यमिक विद्यालय, बोकूड जळगाव या ठिकाणी कॉपी करू देण्यासाठी केंद्र संचालकांना धमकावण्यात आले. याविषयीची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित परिसरातील पोलिस ठाण्याचे प्रमुख एपीआय नीलेश शेळके यांना कळविले. तेव्हा त्यांनी तत्काळ अतिरिक्त बंदोबस्त पाठविल्याचे शिक्षणाधिकारी लाठकर यांनी सांगितले.
त्याशिवाय भीमाशंकर विद्यालयातील परीक्षा केंद्रावरही अशाच पद्धतीने परिसरातील नागरिक, पालकांनी संचालक व पर्यवेक्षकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय खुलताबाद तालुक्यातील शांताराई कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलून जि.प.च्या प्राथमिक शाळेतील स्टाफ देण्यात आला. त्या ठिकाणी विस्तार अधिकारी भोसले यांना समन्वयक नेमले होते. त्यांनी उत्तमपणे परीक्षा घेतल्याबद्दल सीईओ विकास मीना यांनी त्यांचे अभिनंदन केल्याचेही लाठकर यांनी सांगितले.
आठ केंद्रे कायमस्वरूपी बंदची शिफारस
जिल्ह्यात परीक्षेत गडबड करणाऱ्या सहा केंद्रे आगामी वर्षापासून केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याची शिफारस विभागीय मंडळाकडे केली आहे. त्यामध्ये निमगाव आणि ओव्हर जटवाडा या ठिकाणच्या केंद्रांची भर पडली असल्यामुळे एकूण आठ केंद्रांवर आतापर्यंत कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचेही शिक्षणाधिकारी लाठकर यांनी सांगितले.