ग्रामसेवकांच्या संपाचा ग्रामस्थांना मोठा फटका; शासनाने तोडगा काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 04:45 PM2019-09-10T16:45:21+5:302019-09-10T16:48:29+5:30
ग्रामस्थांना दाखले मिळत नसल्याने अडचण
पैठण : ग्रामसेवक गेल्या १९ दिवसापासून संपावर गेल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामसेवकांचा संप मिटविण्यासाठी शासन स्तरावर हालचाल झाली नसल्याने ग्रामस्थात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पैठण तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीचे कामकाज बंद पडल्याने अडचणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सध्या शासनाच्या विविध खात्यात नोकर भरती सुरू असून अर्ज करण्यासाठी लागणारे विविध दाखले मिळत नसल्याने बेरोजगार युवकात यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायतीस पाया तर ग्रामसेवकास कणा मानले गेले आहे . पैठण तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी दैनंदिन कामकाजाचे शिक्के व दप्तर गटविकास अधिकारी यांच्याकडे जमा करून दि २२ ऑगस्ट पासून संप पुकारला आहे, तेव्हापासून ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प आहे.
पैठण तालुक्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून टँकरचा प्रस्ताव पंचायत समिती कडे कसा दाखल करावा असा मोठा प्रश्न अनेक गावासमोर सध्या निर्माण झाला आहे. दुष्काळ परिस्थिती मुळे शासनाच्या विविध योजना सध्या घोषित करण्यात आल्या आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्र मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बेरोजगारांना नोकरीसाठी लागणारे प्रमाणपत्र मिळत नसल्याने युवकात अस्वस्थता आहे. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प पडल्याने गावातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दैनदिन येणाऱ्या अडीअडचणी कोणाकडे सागाव्या असा मोठा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
ग्रामसेवकांच्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सखाराम दिवटे, सागर डोईफोडे, जिजाभाऊ मिसाळ, रमेश आघाव, उपाध्यक्ष नेमाणे सुनिता, खंडु वीर, ईश्वर सोमवंशी, कायदा सल्लागार पंडित सांगळे, संघटक सीमा सोनवणे, महिला संघटक आशा तुपे, संगीता दानवे, सुहासिनी कळसकर,मनीषा क्षीरसागर, दशरथ खराद, सुहास पाटील, प्रशांत साळवे, सिध्दार्थ काकडे, आण्णासाहेब कोरडे , सोमनाथ खराडे, विनायक इंगोले, नितिन निवारे,राजू दिलवाले,बाबासाहेब तांबे कैलास गायकवाड़ तुळशिराम पोतदार,संजय शिंदे यांच्यासह तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक सहभागी आहेत.
काय आहेत ग्रामसेवकांच्या मागण्या....
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करणे. ग्रामसेवक संवर्गास प्रवास भत्ता शासन नियमाप्रमाणे मंजूर करावा. ग्रामसेवकाची शैक्षणिक अर्हता पदवी करावी, लोकसंख्येवर आधारित सजे व पदे याच्यात वाढ करावी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दूर करावी. सन २००५ नंतर रूजू झालेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व आदर्श ग्रामसेवक पुरस्काराची आगाऊ वेतनवाढ द्यावी. ग्रामसेवका कडील अतिरिक्त कामाचा बोजा कमी करावा.
मोठ्या गावांना फटका......
ग्रामसेवकाच्या संपामुळे मोठी लोकसंख्या असलेल्या गावातील नागरी समस्या वाढल्या आहेत पैठण तालुक्यातील चितेगाव, लोहगाव, पाचोड , बिडकीन , विहामांडवा , आडूळ, नवगाव, बालानगर, चांगतपुरी, पिंपळवाडी, आदी मोठ्या गावातील ग्रामपंचायतींना ग्रामसेवकाच्या संपाची झळ बसली आहे .
तोडगा निघावा
ग्रामसेवकांच्या आंंदोलनामुळे विकास कामाना खिळ बसली असून दैनंदिन अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाने संपावर तोडगा काढून संप मिटवावा व ग्रामीण भागातील जनतेला दिलासा द्यावा.
- जाबेर पठाण, सरपंच बालानगर.
शासनाने मागण्या मान्य कराव्यात
शासनाच्या योजना ग्रामीण भागातील ग्रामस्थापर्यत पोहचवण्यासाठी आम्ही रात्रदिवस काम करतो, या व्यतिरिक्त शासनाने वेळोवेळी सोपवलेली कामेही आम्ही करतो. इतर विभागाच्या योजना राबविण्याची जबाबदारी ग्रामसेवकावरच सोपण्यात येते, सर्व करूनही आमच्या संवर्गाच्या रास्त मागण्या शासन मान्य करत नाही. आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच ठेवण्यात येणार आहे. शासनाने पदाधिकारी, ग्रामस्थ यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमच्या रास्त मागण्या मान्य कराव्यात.
- सागर डोईफोडे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना