कवली शिवारात आगडोंब; रब्बी पिकांसह गुरांचा चारा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 06:20 PM2021-02-11T18:20:06+5:302021-02-11T18:20:49+5:30
रब्बी पिकांसह गुरूंचा चारा जळाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान
सोयगाव : कवली शिवारात लागलेल्या आगीत चार एकरवरील शेतीतील पिक जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. आगीने होरपळल्याने ज्वारीचे उभे पिक नष्ट झाले. त्यासोबतच जनावरांसाठी गोळा करून ठेवलेला चारा सुद्धा जळून कोळसा झाल्याने शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत आगीचे कारण कळू शकले नव्हते.
सोयगाव तालुक्यातील कवली शिवारात चिंधा साळवे यांचे गट क्र-५० येथे शेत आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या चार एकर शेतात अचानक आग लागली. एका गुराख्याने याची माहिती गावात दिली. त्यानंतर शेअजारी शेतकरी आणि ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली. मात्र आग नियंत्रणा बाहेर जाऊन चार एकरवरील संपूर्ण क्षेत्रात पसरली. यात ज्वारी आणि आदी रब्बीची पिके, गुरांसाठी गोळा करून ठेवलेला चारा जळून कोळसा झाला.
घटनास्थळी सरपंच वसंत बनकर, पोलीस पाटील निवृत्ती केंडे आदींनी पाहणी केली. आग नियंत्रणात आणण्यासाठी सुमेध बनकर, आनंद साळवे, आलीम तडवी, आरिफ तडवी आदींनी प्रयत्न केले. शेतकरी चिंधा साळवे यांनी सोयगाव तहसील कार्यालयात लेखी निवेदनाद्वारे घटनेची माहिती दिली असून पंचनामा करण्याची मागणी केली आहे.