हज यात्रेकरूंची ‘खिदमत’ थांबविण्यावर हुज्जाज कमिटी ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 06:31 PM2019-07-20T18:31:46+5:302019-07-20T18:34:24+5:30
मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांतील हज यात्रेकरूंना दर्जेदार सेवा देण्याचे काम मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटीने तब्बल ३० वर्षे केले.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांतील हज यात्रेकरूंना दर्जेदार सेवा देण्याचे काम मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटीने तब्बल ३० वर्षे केले. यंदा हज यात्रेकरूंच्या सेवेतही राजकारण घुसले. आजपर्यंत राजकारणविरहित आम्ही सेवा केली. महाराष्ट्र स्टेट हज कमिटी आम्हाला अधिकृतपणे सेवा करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे आम्हीसुद्धा हज यात्रेकरूंची ‘खिदमत’ (सेवा) नाईलाजाने आणि जड अंत:करणाने थांबवीत आहोत, असे मत हुज्जाज कमिटीचे अध्यक्ष तथा धर्मगुरू मौलाना नसीम मिफ्ताही यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
प्रश्न - ‘मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटी’चे नेमके काम काय?
मौलाना नसीम - दरवर्षी हज यात्रेकरूंचे अर्ज भरणे, त्यांना मार्गदर्शन करणे, मराठवाड्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन हज यात्रा कशी करावी, कोणते धार्मिक विधी पूर्ण करावेत; हे पॉवर पॉइंटसह मार्गदर्शन करणे. हज यात्रेकरूंना लसीकरण करून घेणे, औरंगाबाद येथील इम्बारगेशन पॉइंट सांभाळणे. जामा मशीद येथे यात्रेकरूंची थांबण्याची सोय करणे, त्यांना तिकीट, पासपोर्ट आदी सुविधा देणे. ‘अहेराम’ परिधान करून यात्रेकरूंनाथेट विमानतळापर्यंत नेणे, यात्रेकरूंना किंचितही त्रास होणार नाही, याची काळजी कमिटीने असंख्य स्वयंसेवकांच्या मदतीने मागील ३० वर्षांत घेतली. यात्रेकरू जेव्हा परत येतो तेव्हा त्यांना साधी बॅगही उचलण्याची गरज नसते. त्यांचे सामान, ‘जमजम’(पाणी) सर्व साहित्य वाहनापर्यंत नेऊन दिल्या जाते.
प्रश्न- मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटीची स्थापना कधी झाली?
मौलाना नसीम - ११ सप्टेंबर १९८९ मध्ये ‘मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटी’ची स्थापना करण्यात आली. संस्थापक सदस्यांमध्ये मरहूम (पैगंबरवासी) करीम पटेल, अब्दुल गफ्फार साहब, मी स्वत: मौलाना नसीम, प्रा. अब्दुल खालेक, सय्यद अजीज आदींचा समावेश होता. कोणत्याही मूलभूत सोयी- सुविधा उपलब्ध नसताना हज यात्रेकरूंना सेवा देण्याचे काम सुरू झाले. या सेवेत करीम पटेल यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी तीन तप या सेवेत ‘राजकारण’ शिरू दिले नाही. राजकीय हस्तक्षेपही सहन केला नाही. २००७ मध्ये एक राजकीय खेळी करण्यात आली होती. मात्र, ती यशस्वी झाली नाही.
प्रश्न- केंद्रीय हज कमिटीची आज नेमकी भूमिका काय?
मौलाना नसीम - ‘मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटी’ने औरंगाबादहून जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना सेवा द्यावी म्हणून दरवर्षी लेखी ऑर्डर देण्यात येते. हे काम राज्य हज कमिटीचे आहे. केंद्रीय हज कमिटी आजही आमच्या पाठीशी आहे. देशभरात २१ इम्बारगेशन पॉइंट असतात. औरंगाबाद विमानतळावरून आजपर्यंत एकही विमान पाच मिनिटे उशिरा गेलेले नाही. यासंदर्भात केंद्रीय हज कमिटीने प्रमाणपत्रासह आमचा गौरवही केला आहे. आमचे प्रामाणिक काम केंद्रीय हज कमिटीला माहीत आहे. हज यात्रेकरूंना सेवा देण्यासाठी राज्य हज कमिटीमधील काही मंडळी स्वत: यात्रेकरूंना सेवा देऊ इच्छित आहे. ते काम करण्यास तयार असतील तर आम्ही सन्मानाने सेवा थांबविण्यास तयार आहोत. हा निर्णय माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण कमिटीचा आहे.
प्रश्न- सेवा करण्याचे काम न मिळाल्यास कमिटीची भूमिका काय राहणार?
मौलाना नसीम - हज कमिटीने अद्याप आम्हाला लेखी पत्र दिले नाही. काम मिळाले नाही म्हणून आम्ही घरी बसणार नाही. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन यात्रेकरूंना मार्गदर्शन करणे, जुनाबाजार येथील कमिटीच्या कार्यालयात बसून यात्रेकरूंना मार्गदर्शन करणे, यात्रेकरूंची यात्रा अधिक सुकर कशी होईल यादृष्टीने आम्ही काम करीत राहणार आहोत. आमची सेवा ही मनापासून आहे. जगाला दाखविण्यासाठी आम्ही हे काम सुरू केलेले नाही.
हज कमिटीने जिल्हानिहाय आताच समित्या स्थापन केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील कमिटी यंदा यात्रेकरूंना सेवा देण्यास तयार आहे. आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. पवित्र हज यात्रेच्या कामात तरी राजकारण शिरायला नको होते. दुर्दैवाने ते आता शिरले आहे. मागील ३० वर्षे आम्ही राजकारणविरहित सेवा केली, संपूर्ण मराठवाड्याला आमचे काम माहीत आहे.
- मौलाना नसीम, अध्यक्ष, मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटी