हमालांचा संप; अडत बाजार ठप्प !
By Admin | Published: May 2, 2017 11:46 PM2017-05-02T23:46:35+5:302017-05-02T23:47:14+5:30
लातूर : व्यापाऱ्यांकडून मिळणारी हमाली वाढवून देण्याच्या मागणीसाठी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा मंगळवारपासून जवळपास अडीच हजार हमाल, मापाडी, गाडीवानांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
लातूर : व्यापाऱ्यांकडून मिळणारी हमाली वाढवून देण्याच्या मागणीसाठी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा मंगळवारपासून जवळपास अडीच हजार हमाल, मापाडी, गाडीवानांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे लातूरच्या आडत बाजारातील उलाढाल ठप्प झाली आहे. यापूर्वी ३१ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत हमाल, मापाडी, गाडीवानांनी बंद पुकारला होता.
लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांकडून मिळणारी हमाली तुटपुंजी असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. ही हमाली वाढवून मिळावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून माथाडी कामगार संघटना आणि हमाल, मापाडी, गाडीवान संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. याबाबत व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हमाल, मापाडी, गाडीवान संघटनेसोबत बैठकाही घेण्यात आल्या. मात्र व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हा प्रश्न अद्यापि प्रलंबित आहे. एक महिन्यापूर्वी बाजार समितीतील जवळपास तीन हजार कामगारांनी आठ दिवसांचे काम बंद आंदोलन केले होते. यातून तिढा सोडविण्यासाठी दोन वेळा बाजार समिती, व्यापारी आणि कामगारांमध्ये बैठका झाल्या. चर्चाही झाली. मात्र व्यापाऱ्यांनी कामगारांच्या मजुरी दरवाढीला सहमती न दिल्यामुळे हा प्रश्न सुटला नाही. पुन्हा मंगळवारपासून माथाडी व हमाल, मापाडी, गाडीवान कामगार संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास तीन हजार हमाल, मापाडी, गाडीवान काम करतात. सध्या महागाईचे दिवस आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्या मजुरीत हे कामगार काम करतात. वाढत्या महागाईबरोबर आपल्या मजुरीचा दरही वाढवावा, ही प्रमुख मागणी घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून कामगार संघर्ष करीत आहेत. अद्याप या संघर्षाला यश मिळाले नाही. पुन्हा पुन्हा आंदोलन पुकारावे लागत आहे. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहारावर आणि उलाढालीवर परिणाम होत आहे.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे हमाल, मापाडी, गाडीवानांना व्यापाऱ्यांकडून मिळणारी मजुरी अल्प आहे. या मजुरीमध्ये सध्याच्या महागाईनुसार वाढ झाली पाहिजे.
एवढ्या कमी हमालीमध्ये बाजार समितीत काम करणारे जवळपास तीन हजार कामगार आहेत. अल्प हमालीवर त्यांना उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. या हमालीच्या दरवाढीसाठी गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र याकडे व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा कांबळे, शिवाजी कांबळे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)