माणुसकीचा 'अंत'! अपघाताग्रस्त तरुणाला कोणीच केली नाही मदत, तडफडत प्राण सोडले

By सुमेध उघडे | Published: December 7, 2022 02:53 PM2022-12-07T14:53:56+5:302022-12-07T15:13:42+5:30

आकाशवाणी चौकातील घटनेत धडक देणारे वाहन सुसाट वेगात पुढे निघून गेले, तर नागरिकांनी देखील हात आखडता घेतला

Humanity is over! No one helped the young man who had an accident, he died | माणुसकीचा 'अंत'! अपघाताग्रस्त तरुणाला कोणीच केली नाही मदत, तडफडत प्राण सोडले

माणुसकीचा 'अंत'! अपघाताग्रस्त तरुणाला कोणीच केली नाही मदत, तडफडत प्राण सोडले

googlenewsNext

औरंगाबाद : चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या युवकाला आकाशवाणी चौकात रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने धडक दिली. यानंतर वाहन भरधाव वेगात पुढे निघून गेले. मात्र, रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाच्या मदतीला देखील कोणी धावले नाही. त्या युवकाच्या आजूबाजूने अनेक वाहने, पादचारी गेली पण कोणीच मदत केली नाही. काही वेळाने जागरूक नागरिकांनी त्यास घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाला. सुनील प्रल्हाद काळे (वय ३१, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. हृद्य पिळवटून टाकणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

इंदिरानगर येथे योगेश दुराळे यांच्या घरात तो भाड्याने राहत होता. एकुलता एक असलेल्या सुनीलच्या वडिलांचे कोरोना काळात निधन झाले. जालना रस्त्यावर टीएमटी हेल्थ क्लबजवळ चहाच्या टपरीवर काम करीत होता. त्याचबरोबर तो भाजीपाला विक्रीचाही व्यवसाय करीत होता. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास रस्ता ओलांडताना क्रांती चौकाकडून आलेल्या एका वाहनाने त्याला याला धडक दिली. रहदारी कमी असल्याने धडक देणारे वाहन भरधाव वेगाने पुढे निघून गेले. पण जखमी सुनील रस्त्यावर तडफडत पडला होता. त्याच्या आजूबाजूने अनेक वाहने, काही पादचारी गेली. मात्र, नागरिकांनी थांबून मदत केली नाही. 

जवळपास पाच मिनिटे सुनील तसाच रस्त्यावर तडफडत होता. गंभीर जखमी सुनीलकडे पाहून देखील न पाहिल्यासारखे करत अनेकांनी तेथून काढता पाय घेतला. अखेर काही वेळांने जागरूक नागरिक सुनीलच्या मदतीसाठी धावले. त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी पोहोचविले. त्यावेळी डाॅक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. आकाशवाणी चौक बंद केल्यापासून अपघातीमृत्यूची ही दुसरी घटना आहे, असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. गंभीर जखमी व्यक्तीची कोणीच मदत करत नाही याचे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल  झाले आहे. संकटकाळी धावून जाण्याची संस्कृती असलेल्या देशात असेही चित्र दिसत आहे. यामुळे आता माणुसकी संपली आहे का ? असाच प्रश्न आता विचारला जात आहे. 

Web Title: Humanity is over! No one helped the young man who had an accident, he died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.